

उल्हासनगर: म्हशींना नैसर्गिकरीत्या नव्हे, तर प्रतिबंधित औषधांच्या जोरावर लवकर पान्हा आणण्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरात उघडकीस आला आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तबेल्यावर पोलिसांनी छापा टाकत तबेला चालक प्रकाश अमरलाल वाधवानी (वय 64) याच्याकडून 612 ऑक्सिटोसिनच्या प्लास्टिक बाटल्या जप्त केल्या.
सुमारे 11 हजार रुपयांचा हा प्रतिबंधित साठा बेकायदेशीररित्या ठेवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने उल्हासनगर कॅम्प-3 येथील जसलोक हायस्कूलजवळील तबेल्यावर छापा टाकला. या कारवाईत तबेल्यातील सुमारे 50 म्हशींना लवकर पान्हा येण्यासाठी शासनाने प्रतिबंधित केलेल्या ऑक्सिटोसिनचा वापर होत असल्याचे आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून 612 प्लास्टिक बाटल्या जप्त करत साठा ताब्यात घेतला.
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सीआर क्रमांक 358/2026 अन्वये औषधे व प्रसाधने अधिनियमातील कलम 18(अ) व 18(c), भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 223 तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यातील कलम 11 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सुरू असून ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कोबरणे, पोलीस हवालदार सुभाष सूर्यवंशी, जितेंद्र चौधरी, पोलीस शिपाई किशोर काळे तसेच औषध निरीक्षक मनीष घोतमारे आणि जोसेफ चिरमेल यांनी संयुक्तपणे केली.
ऑक्सिटोसिनचा गैरवापर किती धोकादायक?
ऑक्सिटोसिन हे प्रसूतीदरम्यान गर्भाशयाचे आकुंचन वाढवण्यासाठी आणि वैद्यकीय गरजेनुसार वापरले जाणारे औषध आहे. पशुवैद्यकीय वापरालाही कठोर नियम लागू आहेत. काही तबेल्यांमध्ये दूध लवकर व अधिक प्रमाणात मिळावे किंवा पान्हा पटकन यावा म्हणून त्याचा बेकायदेशीर वापर केला जातो.
ऑक्सिटोसिनचा विनापरवाना साठा व गैरवापर हा कायद्याने दंडनीय असून अशा प्रकरणांमध्ये औषधे व प्रसाधने अधिनियमासह इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला जातो.
दुष्परिणाम कोणते?
प्राण्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. गर्भाशयावर ताण येऊन प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. वारंवार वापरामुळे प्राण्यांना वेदना व शारीरिक त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्राण्यांवरील क्रूरतेचा मुद्दाही निर्माण होतो.