ठाणे : TDRF पथकासह अग्शिनशमनच्या दोन गाड्या इर्शाळवाडीला रवाना | पुढारी

ठाणे : TDRF पथकासह अग्शिनशमनच्या दोन गाड्या इर्शाळवाडीला रवाना

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे आपत्ती प्रतिसाद (TDRF) दलाच्या दोन पथकांसह अग्शिनशमन दलाच्या दोन गाडया ठाणे येथून रवाना झाल्या आहेत. दुर्घटनाग्रस्त ठिकाणी मदतकार्य गतिमान पध्दतीने व्हावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही पथके पाठविण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

खालापूर येथील इर्शाळवाडी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत या वाडीतील घरे मातीच्या भरावाखाली गाडली गेली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनाग्रस्त ठिकाणी जेसीबी व अन्य कोणत्याही मशीनरी पोहचणे शक्य नसल्याने मनुष्यबळाच्या साहाय्याने बचाव कार्य सुरू आहे. यासाठी ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलामार्फत दोन गाड्या रवाना करण्यात आले आहे. जेणेकरून अंधार पडल्यावर मदतकार्यात अडथळा येणार नाही असे आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

बुधवारी होत असलेल्या अतिवृष्टीमुळे महाड येथे पूर परिस्थिती निर्माण झाल्यास मागील वर्षाच्या पार्श्वभूमीवर तातडीने मदत मिळावी यासाठी बुधवारी सायंकाळी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे 15 जवानाचे पथक रवाना करण्यात आले होते. मात्र खालापूर दुर्घटना घडल्याने सदर ठिकाणचे पथक हे पहाटे खालापूर येथे पाठविण्यात आले असून आज सकाळी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे 7 जवानाचे पथक खालापूर येथे पोहचले आहेत. तसेच अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांसह 7 जवान देखील मदतकार्यासाठी खालापूर येथे पोहचले आहे. या दुर्घटनेतून बचावलेल्या रहिवाशांना तात्पुरत्या निवासाची सोय व्हावी यासाठी आठ कंटेनर देखील पाठविण्यात आले आहे. तसेच खालापूर येथील स्थानिक प्रशासनाशी वेळोवेळी समन्वय साधून आवश्यकतेनुसार आवश्यक ती यंत्रसामुग्री पुरविण्याच्या सूचना ही आयुक्त बांगर यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

Back to top button