परमबीर सिंग यांना अटक करून हजर करा | पुढारी

परमबीर सिंग यांना अटक करून हजर करा

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलिस आयुक्‍त परमबीर सिंग यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश देत ठाणे न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी सिंग यांच्याविरुद्ध गुरुवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केल्यानंतर परमबीर सिंग स्वतःच कित्येक दिवसांपासून बेपत्ता आहेत.

परमबीर सिंग यांच्यासह 28 जणांवर खंडणी उकळण्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्या तपासासाठी ठाणे पोलिस आयुक्‍त जयजित सिंग यांनी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन केले आहे. हे पथक परमबीर यांचा शोध घेत असून सिंग यांचा आतापर्यंत कुठेही ठावठिकाणा लागलेला नाही.

यापूर्वीच लूकआऊट नोटीस

तपासासाठी पोलिस उपायुक्‍त अविनाश अंबुरे यांच्या अधिपत्याखाली पाच अधिकारी आणि पाच कर्मचार्‍यांचा या एसआयटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. देशाबाहेर जाऊ नये यासाठी परमबीर सिंग यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे.

सिंग परदेशात गेल्याची चर्चा

दरम्यान, सिंग आहेत तरी कुठे, असा सवाल कायम आहे. सध्या गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) प्रमुखपदी असलेले सिंग 5 मे 2021 पासून सुट्टीवर गेले होते. त्यानंतर ते परतलेच नाहीत. परमबीर सिंग यांच्याविरोधात चंदीगडसह तीन ठिकाणी वॉरंट बजावण्यात आले आहे. मात्र ते या तीनही ठिकाणी मिळून न आल्याने सिंग परदेशात पळून गेल्याची चर्चा रंगली आहे. सेवेत असताना एक आयपीएस दर्जाचा अधिकारी अचानक बेपत्ता व्हावा आणि त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांवर वॉरंट बजावण्याची वेळ यावी, अशी घटना राज्याच्या इतिहासात दुर्मीळ ठरली आहे.

फरार घोषित करणार

परमबीर सिंग यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने त्यांचा शोध तपास यंत्रणा घेतच आहे. मात्र ते सध्या सेवेत असून त्यांनी राजीनामा दिलेला नाही अथवा त्यांना निलंबित देखील करण्यात आलेले नाही. अशा स्थितीत सिंग यांना विदेशात जाताना मुख्यमंत्र्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र त्यांनी अशी कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे आणि सिंग कुठे आहेत हे माहीत नसल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. या परिस्थितीत सिंग समोर आले नाहीत तर साहजिकच त्यांना फरार घोषित करण्याची कायदेशीर प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. इतकेच नव्हे तर त्यांची संपत्ती देखील सील करण्याची कारवाई होऊ शकते, असे सूत्रांकडून कळते.

खंडणी वसुली प्रकरणात परमबीर यांच्यासह 28 जण आरोपी

परमबीर यांच्या निर्देशावरून ठाणे खंडणी विरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे यांच्यासह काही अधिकार्‍यांनी आपल्याला धमक्या देऊन साडेतीन कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप सोनू जालान, रिजाय भाटी आणि केतन तन्‍ना यांनी केला होता.

या प्रकरणी ठाणेनगर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये 28 जणांना आरोपी करण्यात आले आहे. त्यामध्ये परमबीर सिंग, दीपक देवराज, प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे, एन. टी. कदम आदी आठ पोलिस अधिकार्‍यांचा समावेश आहे.

Back to top button