Sharad Pawar Group Meet : ठाण्यात ‘पॉवर गेम’मध्ये जितेंद्र आव्हाडांची सरशी | पुढारी

Sharad Pawar Group Meet : ठाण्यात 'पॉवर गेम'मध्ये जितेंद्र आव्हाडांची सरशी

ठाणे :पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत ठाण्यातून १५ माजी नगरसेवक असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात बुधवारी झालेल्या मुंबईमधील शक्ती प्रदर्शनात राष्ट्रवादीचे २० माजी नगरसेवक माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासमवेत हजर असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. त्यामुळे या पॉवर गेममध्ये आव्हाड सध्या तरी सरस ठरल्याची चर्चा आहे. दुसरीकडे नजीब मुल्ला यांच्यासोबत आणखी तीन माजी नगरसेवकांचाही पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे.

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रावादी काँग्रेस दोन गटात विभागली गेली आहे. शरद पवार विरुध्द अजित पवार असा संघर्ष उभा झाला आहे. त्यानुसार बुधवारी या दोघांनीही शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मुंबईत एक बैठक लावली होती. या बैठकीत कोण बाजी मारणार यावरुन अनेक तर्कविर्तक लावले जात होते. परंतु ठाण्यातूनही आव्हाड विरुध्द मुल्ला असा सामना यावरुन रंगल्याचे दिसून आले. शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली ठाणे, कळवा, मुंब्रा येथील हजारो कार्यकर्ते तब्बल ९१ बस घेऊन मुंबईला गेल्याचा दावा केला जात आहे. तसेच ठाण्यातून ब्लॉक अधिकारी, कार्यकर्ते तर कळवा, मुंब्रातून माजी नगरसेवकांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.

ठाण्यात राष्ट्रवादीचे ३४ तसेच एक अपक्ष असे ३५ नगरसेवकांचे संख्याबळ होते. त्यातील पाच माजी नगरसेवकांनी काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तर मुंब्य्रात मुंब्रा विकास आघाडी स्थापन करण्यात आली असून त्यात राष्ट्रवादीचे ८ माजी नगरसेवक असल्याचा दावा पुन्हा एकदा केला गेला आहे. तर अजित पवार वेगळे झाल्यानंतर त्यांच्यासोबत ठाण्यातील १५ माजी नगरसेवक असल्याचा दावा नजीब मुल्ला यांनी केला होता. परंतु, बुधवारी शक्तीप्रदर्शनाच्या दिवशी २० माजी नगरसेवकांची साथ आव्हाडांना असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. तर २० पैकी १९ ब्लॉक अध्यक्ष देखील आव्हाड यांच्यासोबत असल्याचे सांगितले गेले आहे. दुसरीकडे तर अजित पवार यांच्यासोबत शहर अध्यक्ष आनंद परांजपे, माजी नगरसेवक नजीब मुल्ला आणि तीन माजी नगरसेवकच गेले असल्याचा दावा केला गेला आहे. त्यामुळे पॉवर गेममध्ये ठाण्यात आव्हाड सरस ठरल्याची चर्चा सुरु झाली आहे.

हेही वाचा 

Back to top button