

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघत आहे. २ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडली. अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अदिती तटकरे यांसह नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, बुधवारी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या बैठका झाल्या. शरद पवार गटाची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर, तर अजित पवार यंच्या गटाची बैठक वांद्रे येथील एमईटी कॉलेजच्या सभागृहात पार पडली. यावेळी शरद पवारांच्या गटापेक्षा अजित पवारांच्या गटात जास्त आमदारांची उपस्थिती दिसली.
अजित पवार गटाच्या बैठकीत छगन भुजबळ यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच सत्तेत सहभगी होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, 'शरद पवार आमचे विठ्ठल आहेत. पण त्यांना पक्षातील काही बडव्यांनी घेरले आहे. साहेब, या बडव्यांना दूर करा. आम्हाला आवाज द्या. आम्ही तुमच्यासोबत येतो. आपण सरकारमध्ये राहून महाराष्ट्राच्या विकासाचे काम करू.' पवार यांना बडव्यांनी घेरल्याचे विधान करताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पवारांना घेरणारे ते बडवे कोण? असा सवाल केला जात आहे. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे यामध्ये येतात का? अशीही चर्चा रंगली आहे.
राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा जे भाषण केले त्यात त्यांनी बाळासाहेब ठाकरेंविषयी असेच वक्तव्य केले होते. माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर त्यांच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे असे राज ठाकरे शिवसेना सोडताना म्हणाले होते. त्यांचे हे वक्तव्य चांगलेच गाजले होते. त्याच प्रमाणे आज भुजबळ यांनी शरद पवार यांचाही उल्लेख विठ्ठल असा केला आहे.
'मी तुरुंगातून बाहेर आलो तेव्हा अनेकांनी आमिषे दाखवली. पण आम्ही गेलो नाही. शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलो आणि काम केले. पण आता काय हा प्रश्न आहेच. साहेबांना (शरद पवार) वाईट वाटणे स्वाभाविक आहे. दिलीप वळसे पाटील यांच्यापासून सगळी मंडळी गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी तरळणे स्वाभाविक आहे. लोक म्हणतात शरद पवार यांचा फोटो का लावला? ते आमचे विठ्ठल आहेत. मात्र या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे. साहेबांबद्दल आजही आमच्या मनात प्रेम असून अजूनही काही बिघडलेले नाही, आम्हाला आशीर्वाद द्या. अनेकजण म्हणतात की, आम्ही अपात्र होऊ, वैगरे पण असे काही होणार नाही, कुणीही अपात्र होणार नाही, म्हणून घाबरायचे कारण नाही. जोमाने काम सुरु करून कार्यकर्त्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही,' असा विश्वास यावेळी छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेच्या शरद पवार गटाच्या बैठकीत बंडखोर अजित पवर गटावर निशाण साधण्यात आला. यावेळी छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना जयंत पाटील म्हणाले की, 'फुटलेले काही लोक 'माझ्या विठ्ठला भोवती बडवे असून ते मला भेटून देत नाहीत', असे सांगू लागले आहेत. मात्र दोन वर्षांचा तुरुंगवास भोगून त्यांचे पुण्याला आगमन झाले त्यावेळी त्यांच्या डोक्यावर फुले पगडी शरद पवारांनीच ठेवली होती. त्यावेळी बडवे आडवे आले नाहीत का? ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला, त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात. आता तुम्ही महाराष्ट्राला काय उत्तर देणार? उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादीमधून सर्वात पाहिले नाव हे छगन भुजबळ यांचे दिले. तेव्हा बडवे आडवे नाही आले?' असा सवाल पाटील यांनी केला.
यावेळी ते म्हणाले की, 'पक्षाकडून एक निरोप गेला. आणि कार्यकर्ते आज बैठकीला आले. शरद पवार यांच्यावरील प्रेमापोटी इथे सगळे आले आहेत. अनेक संकटांचा सामना शरद पवारांनी केला. गेल्या 25 वर्षात राष्ट्रवादी पक्ष अनेकांनी फोडण्याचा प्रयत्न केला. आज काही लोक बाजूला गेले याचं आम्हाला दुःख आहे. फुटून गेलेल्या अनेकांवर काही प्रसंग आले त्यावेळी शरद पवार त्यांच्या मागे उभे राहिले. 5 वर्षे एकही दिवस सुट्टी न घेता मी काम केले. राज्यात जिथे पक्षाची ताकद नव्हती तेथे पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला.'
"उद्धव ठाकरेंची साथ सोडून जे 40 जण गेले त्यांची जी तक्रार होती तीच तक्रार आता तिथे जाऊन बसली आहे. म्हणून आता शिंदे गटातील आमदारांना परत फिरण्याचे वेध लागले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात एवढी अस्थिरता घालमेल आणि भीती मी आजवर बघितली नव्हती. तत्व, मर्यादा, भूमिका, धोरण आणि दिशा माणसाच्या आयुष्यात असायला हवी. आपण जर ते सोडायला लागलो तर आपल्याला आपल्या मागे फॉलो करणारे काय म्हणतील?" असे पाटील म्हणाले.