ठाणे : अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी; एकाची भोसकून हत्या | पुढारी

ठाणे : अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी; एकाची भोसकून हत्या

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : खेळण्यावरून आणि डोक्यात टपली मारण्याच्या क्षुल्लक कारणावरून उद्भवलेले भांडण एका विद्यार्थ्याच्या जीवावर बेतले. ठाण्यातील या प्रकाराने उघडलेल्या शाळांसमोर नवे मानसिक संतुलनाचे आव्हान निर्माण केले आहे.

ठाण्याच्या ज्ञानेश्वर नगर परिसरातील राजश्री शाहू महाराज विद्यालयात मंगळवारी सकाळी दहावीच्या मुलांचे वर्ग भरल्यावर किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला तो खेळण्यावरून आणि डोक्यात टपली मारण्यावरून. त्यावरून दहावीच्या वर्गात शिकणार्‍या अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या दोन गट पडले. त्यांच्यात उद्भवलेल्या हाणामारीत धारदार हत्याराने छातीत भोसकण्यात आल्याने तुषार साबळे या 15 वर्षीय विद्यार्थीचा मृत्यू झाला. पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.

अलिकडेच याच शाळेत दहावीच्या ए डिव्हीजनमध्ये प्रवेश घेतलेला तुषार हा वाद सोडवण्यासाठी गेला आणि छातीत धारदार वस्तूचा वार झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वागळे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय ढोले यानी सांगितले. मृत विद्यार्थीचे वडील गोरख साबळे हे ठाणे परिवहनच्या टीएमटीमध्ये चालक म्हणून काम करतात.

तब्बल दोन वर्षांनंतर शाळा उघडल्या आणि हा प्रकार घडल्याने प्रचंड सन्नाटा निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांची सहनशीलता संपली आहे काय? संयम संपला आहे काय? इतरांना सोबत घेऊन खेळण्याची सवय गेली काय? असे अनेक प्रश्न या घटनेने निर्माण केले. मुलांच्या स्वभावांचे ताल आणि तोल तपासण्याची ही वेळ यानिमित्ताने आली आहे.

Back to top button