

कसारा; शाम धुमाळ : राज्यभरातील आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांचा मंत्रालयाकडे निघालेला बिऱ्हाड मोर्चा इगतपुरी येथे पोहचला आहे. यादरम्यान हजारो मोर्चेकरांनी मुंबई-नाशिक महामार्गांवरील दोन्ही कसारा घाटात रस्ता रोको आंदोलन केल्याने वाहणांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथून विविध मागण्यांसाठी या बिऱ्हाड मोर्चाला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली आहे.
शाळेतील आणि वस्तीगृहातील रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांनी हा बिऱ्हाड मोर्चा काढला आहे. २५ मे रोजीचे आदिवासी विकास विभागाचे शासन पत्र रद्द करावे, दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर बाहेरील कर्मचाऱ्यांना घेऊ नये, दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांना दहा वर्षे पूर्ण होईपर्यंत शासन सेवेत संरक्षण देण्यात यावे तसेच त्यांना सेवेतून कमी करू नये, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या या मोर्चाला सीटू संघटनेने पाठींबा दिला असुन मंत्रालयाच्या दिशेने रवाना होण्यासाठी हा मोर्चा मुंबईच्या वेशीवर दाखल झाला आहे. मुंबईची वेस असलेल्या कसारा घाटात हा मोर्चा आला असून सरकारने मागण्यांचा विचार करून ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी मागणी करून या मोर्चाला विविध संघटनानी पाठिंबा दिला आहे. या मोर्च्यात मोठ्या प्रमाणावर महिला लहान मुले व अपंग युवक सहभागी झाले आहेत.