ठाणे : डॉक्टरांची 'वेळ' पडली लाखात | पुढारी

ठाणे : डॉक्टरांची 'वेळ' पडली लाखात

उल्हासनगर; पुढारी वृत्तसेवा :  सायबर चोर फसवणुकीसाठी नवीन गुन्हेपद्धत शोधून काढत असतात. आता तर बड्या रुग्णालयांतील डॉक्टरांच्या वेळा मिळवून देण्याच्या बहाण्याने रुग्णांची फसवणूक केली जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. रुग्णालयाचे कर्मचारी असल्याचे भासवून अज्ञात इसमांनी दोन महिलांची ऑनलाइनद्वारे १ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर कॅम्प ३ येथील ओटी सेक्शन परिसरात हरे कृष्ण अपार्टमेंटमध्ये फॅशन डिझायनर सुहाना कुकरेजा (३५) राहतात. सुहाना यांच्या ओळखीचा टेलर हा आजारी पडलेला असताना तिने त्याला कल्याण येथील खडकपाडा परिसरातील आयुष हॉस्पिटल येथे जाण्याचा सल्ला दिला. हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी अपॉइंटमेंट घेण्यासाठी सुहानाने गुगलसर्चद्वारे सदर हॉस्पिटलचा मोबाईल नंबर घेतला. या मोबाईल नंबरवर संपर्क केला असता अज्ञात व्यक्तीने फोन उचलला. त्याने सुहानाला व्हाट्सअॅपवर लिंक पाठवून फॉर्मवर माहिती भरण्यास सांगितले. सुहानाने माहिती भरून फॉर्म पाठविला असता तिच्या बँक अकाउंटमधून सदर अज्ञात व्यक्तीने १ लाख रुपये काढून घेतले.

सुहाना हिची मैत्रीण शिवानी तिवारी हिची देखील अश्याच प्रकारे फसवणूक करण्यात आली आहे. शिवानीने तिच्या आईच्या वैद्यकीय तपासणीसाठी ऑनलाइनद्वारे उल्हासनगरच्या रेडक्रॉस रुग्णालयाचा व्हाट्सअप नंबर घेतला. या नंबर वरून मिळालेल्या लिंकद्वारे माहितीचा फॉर्म भरला असता शिवानीच्या अकाउंटमधून सुद्धा ४५ हजार रुपये काढून अज्ञात व्यक्तीने काढून घेतले. या संदर्भात पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हे लक्षात असू द्या

  • रुग्णालयाच्या क्रमांकासाठी गुगल सर्चचा वापर करू नये
  • अधिकृत संकेतस्थळावरील क्रमांकाचा वापर करावा
  • अनोळखी व्यक्तीने पाठविलेल्या लिंकवर क्लिक करू नये
  • लिंकवर स्वतःचा आणि विशेषकरून बँक खात्याचा तपशील भरू नये
  • अनोळखी व्यक्तीला ऑनलाइन पैसे पाठवताना जपून
  • एनी डेस्क, क्विक सपोर्ट, टीम व्ह्यूअर अॅप डाऊनलोड करू नये

Back to top button