राज्यात होणार १७ हजार शेतीशाळा | पुढारी

राज्यात होणार १७ हजार शेतीशाळा

ठाणे; दिलीप शिंदे : पावसाचा लहरीपणा, बदलत्या हवामानाचा पिकाला फटका बसून शेतकरी देशोधडीला लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीचे योग्य नियोजन करीत आधुनिक शेतीची कास कशी धरावी, शेतातील पीक सशक्त, निरोगी कसे जोपासावे, पिकांची उत्पादकता वाढावी याचे धडे शेतीशाळेत दिले जाते. यातून शेतकरी स्वावलंबी बनत असल्याने राज्यभरात यावर्षी सुमारे १७ हजार शेतीशाळा नियोजित असून त्यामध्ये एकट्या कोकणात दीड हजार शेतीशाळा सुरू होणार आहेत.

शेतकरी जे पीक घेतात त्या पिकामध्ये तज्ज्ञ बनवण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणजे शेती शाळा होय. शेती शाळा ही प्रत्यक्ष शेतावर घेतली जाते. यासाठी प्रगतीशील शेतकरी यांचे एक एकरचे क्षेत्र निवडले जाते. या क्षेत्रावरच गावातील जवळपासचे त्या पिकाचे किमान २५ शेतकरी त्या हंगामात त्या पिकांच्या पेरणीपासून ते मळणीपर्यंत दर १५ दिवसांनी एकत्र येतात. या प्रकारे १० वर्ग शेतावरच होतात. एक वर्ग किमान २ तासाचा असतो. या शेती शाळेत कमीत कमी व्याख्याने आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून अनुभवातून शिक्षण अभिप्रेत आहे. या निवडलेल्या क्षेत्रावर सुधारीत तंत्रज्ञानाचे पथदर्शी प्रात्यक्षिक केले जाते. यामध्ये एकात्मिक पिक व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन इत्यादीबाबींचा अवलंब केला जातो. शेतकरी या क्षेत्रावर एकत्र येऊन आपापले या सुधारित तंत्रज्ञानाबाबातचे तसेच पिकाबाबतचे अनुभव एकमेकांना सांगतात आपापसात चर्चा करतात व प्रात्यक्षिक प्लॉटची निरीक्षणे घेतात. किडीची चित्रे काढून ते ओळखण्याचा अभ्यास करून उपाय कसे केले जाते याचे प्रशिक्षण घेतले जाते. त्यांना कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करतात.

या शेतीशाळा खरीप आणि रब्बी पिकांसाठी भरवल्या जातात. एकट्या कोकणात गेल्या वर्षी १ हजार २६३ शेती शाळा भरवण्यात आल्या होत्या. शाळेला मिळणारा प्रतिसाद आणि फायदे पाहता यावर्षी सुमारे १ हजार ४५९ शेतीशाळा सुरू केल्या जाणार आहेत. त्यामध्ये रायगड जिल्ह्यात ३७४ शाळा, रत्नागिरी ३२४, पालघर ३००, ठाणे २३१ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२९ शाळा भरतील.

शेती

Back to top button