

ठाणे; वृत्तसंस्था : चक्क धावत्या दुचाकीवर आंघोळ करण्याचा अजब प्रकार एका जोडप्याने उल्हासनगरमध्ये केला असून, त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगरच्या सेक्टर १७ च्या मुख्य सिग्नलला दुचाकीवर येत असलेले जोडपे चक्क आंघोळ करत होते. पाठीमागे बसलेली महिला हातातील बादलीतील पाणी मगमध्ये घेऊन चालकाच्या डोक्यावर व आपल्या अंगावर टाकून घेत होती. सिग्नलवर थांबले असताना व नंतर सिग्नल हिरवा झाल्यावर वाहन चालवताना त्यांची ही मोबाईल आंघोळ सुरूच होती.
अनेकांनी या प्रकारचे व्हिडीओ केले व ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाले. ट्विटरवर एका व्यक्तीने 'मनोरंजनाच्या नावाखाली फालतूपणा,' असे नमूद करीत हा व्हिडीओ पोलिसांना टॅग केला. यानंतर पोलिसांनी तत्काळ या जोडप्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या व्हिडिओची सध्या सर्वत्रच चर्चा सुरू आहे.