ठाण्यात 23 मे रोजी महिला आयोग आपल्या दारी उपक्रम | पुढारी

ठाण्यात 23 मे रोजी महिला आयोग आपल्या दारी उपक्रम

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : महिलांच्या तक्रारींवर सुनावणी घेण्यासाठी राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रुपाली चाकणकर व महिला आयोगाच्या सदस्यांचा 23 मे रोजी ठाणे शहरात येत आहेत. महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना तक्रारींचे निरसन स्थानिक स्तरावर होणार आहे. या जनसुनावणीस जास्तीत महिलांनी उपस्थित राहून समस्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहचणे शक्य होत नाही. महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरीता महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाद्वारे ठाणे जिल्ह्यात जनसुनावणी होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात २३ मे रोजी सकाळी १०.३० वा. या जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसुनावणीस आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर व सदस्या उपस्थित रहाणार आहेत.

तक्रारदार पिडीत महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी, कोणतीही पिडीत महिला कोणतीही पूर्व सुचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली लेखी समस्या आयोगा समोर मांडू शकेल. तसेच प्राप्त तक्रारीबाबत पॅनलद्वारे झालेल्या शिफारशीप्रमाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, महिला समुपदेशन केंद्र, महिलांच्या समस्यांशी संबंधित विभाग तसेच पोलीस स्टेशन यांच्या समन्वयाने पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील तक्रारदार पिडीत महिलांनी उपरोक्त नमूद ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या जनसुनावणीस जास्तीत जास्त प्रमाणत उपस्थित राहून आयोगासमोर आपले म्हणणे मांडल्यास आपल्या समस्यांचे निराकरण करण्यास मदत करण्यात येईल, असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.

Back to top button