ठाणे : धक्कादायक .. डॉक्टरच करीत होती मुलांची विक्री | पुढारी

ठाणे : धक्कादायक .. डॉक्टरच करीत होती मुलांची विक्री

उल्हासनगर; पुढारी वृत्तसेवा :  उल्हासनगरमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथं नवजात बाळ विकणाऱ्या टोळीची मोरक्या दुसरी तिसरी कोणी नसून उल्हासनगर मधील एक महिला डॉक्टर आहे. या डॉक्टर महिलेच्या माध्यमातून नवजात बाळ विकणारी महाराष्ट्रातील सक्रिय टोळीचा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केला आहे.­

उल्हासनगर मधील कॅम्प नंबर तीनच्या भगतसिंग कवा राम चौक या परिसरात मीना अपार्टमेंट आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर चित्रा चैनानी या डॉक्टरचे महालक्ष्मी क्लिनिक आहे. याच क्लिनिक मधून मुलांच्या विक्रीचा व्यवसाय सुरू होता. अनेक वर्षांपासून अश्या प्रकारे मुले विकण्याचा हा व्यवसाय सुरू असल्याची माहिती इथल्या नागरिकांना होती, मात्र पुढे कोण येत नव्हतं. अखेर सामाजिक कार्यकर्त्या सानिया हिंदुजा यांना ही माहिती मिळाली आणि त्यांनी ज्योती मोरे या महिलेला डमी ग्राहक म्हणून डॉक्टर चैनानी यांच्याकडे पाठवलं.

ज्योती मोरे यांना दोन मुली असल्याने त्यांनी मला मुलगा हवा आहे, असं डॉक्टर चैनानी यांना सांगितलं. दरम्यान पहिल्या वेळेस तीन महिने या सगळ्या गोष्टींवर काम करून देखील डॉक्टरचा भांडाफोड या सामाजिक कार्यकर्त्यांना करता आला नाही. मात्र ज्योती मोरे यांना डॉक्टर चित्रा यांनी एक दोन दिवसाचा पुरुष जातीचा बाळ आल्याची माहिती दिली. मात्र हे बाळ खरेदी करायचं असेल तर त्यासाठी सात लाख रुपये मोजावे लागतील, असे देखील तिने सांगितलं. दरम्यान डॉक्टरचा फोन आल्यानंतर तात्काळ ज्योती मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सानिया हिंदुजा यांना याची माहिती दिली.

महिला बालकल्याण विभाग आणि गुन्हे अन्वेषण विभाग ठाणे यांना याची माहिती दिली. तात्काळ हे पथक उल्हासनगर मध्ये दाखल झालं आणि त्यांनी बाळाची सात लाखात विक्री होत असताना डॉक्टर चित्रा चैनानी आणि त्यांच्या रॅकेटचा भांडाफोड केला. विशेष म्हणजे अवघ्या दहा हजार रुपयांसाठी या रॅकेट मधील बेळगावात राहणारा व्यक्ती देखील उल्हासनगर मध्ये आला होता. धक्कादायक बाब म्हणजे गेली अनेक वर्ष ही डॉक्टर अश्याच प्रकारे मुलं खरेदी विक्रीचा व्यवसाय करून लाखो रुपये कमवत असल्याची माहिती या सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली. आतापर्यंत या डॉक्टरने जवळजवळ दहापेक्षा अधिक मुलांची खरेदी विक्री केल्याची माहिती देखील या सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली. त्याचबरोबर अनेक कुमारवयीन मुलींचा गर्भपात देखील या डॉक्टरकडून केला जात असल्याचा आरोप या सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

सध्या गुन्हे अन्वेषण विभाग ठाणे आणि महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने या रुग्णालयाची झाडाझडती घेत चौकशी सुरू असून डॉक्टर चित्रा चैनानी, देमांना कमरेवर, संगीता वाघ, गंगा योगी, प्रतिभा मगरे यांच्यासह आदींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान या सगळ्या प्रकारामुळे उल्हासनगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Back to top button