

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात १ लाख ६८ हजार ७१३ गरोदर महिलांनी पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेतला असून, ६२ कोटी ९३ लाख एक हजार रुपये एवढे अनुदान महिलांना त्यांच्या बँक खात्यावर डिबीटीद्वारे वितरित करण्यात आले आहे. गरोदर महिलांसह बाळाच्या पोषणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी या अनुदानाचा उपयोग झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
भारतातील असंख्य महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्यापर्यंत मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे गर्भवती व स्तनदा माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन कधी कधी मृत्यू संभवतो. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गरोदर आणि स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुदृढ व्हावे आणि मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा, यासाठी केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री मातृवंदना योजना १ जानेवारी २०१७ पासून राबविण्यात आली आहे. मातृत्व वंदना योजना सुरु झाल्यापासून, १ जानेवारी २०१७ ते ३० मार्च २०२३ या कालावधीत ठाणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील १ लाख ६८ हजार ७१३ महिलांनी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजेनचा लाभ घेतला आहे. या महिलांना ६२ कोटी ९३ लाख १ हजार रुपये एवढी रक्कम त्यांच्या बँक खात्यावर डिबीटीद्वारे वितरित करण्यात आली आहे. यामध्ये शहरी भागातील १ लाख २६ हजार १०९ महिलांचा समावेश असून, ग्रामीण भागातील ४२ हजार ६०४ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
अंगणवाडी, आरोग्य केंद्राला भेट देऊन अर्ज करता येणार महिला आणि बाल विकास मंत्रालया मार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेमार्फत महिलांना टप्प्या टप्प्याने पाच हजार रूपये दिले जातात. पात्र महिला जननी सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थी असल्यास तिला अतिरिक्त एक हजार रुपये म्हणजेच एकूण सहा हजार रुपये दिले जातात. यासाठी अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्राला भेट देऊन अर्ज करता येतो. ही रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात वर्ग केली जाते. याचा पहिला हप्ता अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपये, दुसरा हप्ता हा गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर दोन हजार रुपये, तर तिसरा हप्ता हा पाल्याच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी दोन हजार रुपये दिला जातो.