पाकिस्तानातील ६०० भारतीय मच्छीमारांची सुटका होणार ! | पुढारी

पाकिस्तानातील ६०० भारतीय मच्छीमारांची सुटका होणार !

भाईंदर; राजू काळे :  अरबी समुद्राची हद्द चुकीने ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या ६६६ पैकी ६०० भारतीय मच्छिमारांची येत्या १३ मे रोजी सुटका केली जाणार असल्याची माहिती नॅशनल फिशरमन वर्कर्स (एनएफएफ) चे अध्यक्ष तथा उत्तन येथील मच्छिमार नेते लिओ कोलासो यांनी दिली. यामुळे त्या भारतीय मच्छिमार कुटूंबांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला असून त्यांचे डोळे पाकिस्तानी तुरुंगातून भारतात परतणाऱ्या आपल्या कुटूंब सदस्याकडे लागले आहेत.

भारतातील ६६६ मच्छिमार मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले आणि पाकिस्तान सरकारने त्यांना पकडून तुरुंगात डांबले. याउलट पाकिस्तानमधील ८३ मच्छिमार भारताच्या तुरुंगात आहेत. पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडलेल्या भारतीय मच्छिमारांची सुटका व्हावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून एनएफएफकडून प्रयत्न केले जात होते. तर या दोन्ही देशांतील मच्छिमारांची सुटका करण्याच्या अनुषंगाने १३ एप्रिल २०२३ रोजी अहमदाबाद व कराची येथे मच्छिमार नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान मोहम्मद शरीफ यांना आपापल्या देशातील तुरुंगात असलेल्या मच्छिमारांना तात्काळ सोडण्यात यावे, असे विनंती वजा पत्र दिले. त्यात दोन्ही देशांतील मच्छिमारांना तुरुंगातून सोडले नाही तर आम्ही संयुक्त राष्ट्र संघटनेकडे (युनो) दाद मागणार असल्याचे नमूद करण्यात आले.

चर्चा सुरु असतानाच पाकिस्तान प्रसार माध्यमांनी पाकिस्तानातील तुरुंगात असलेल्या ६६६ पैकी ६०० मच्छिमारांना भारतात परत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त प्रसारीत करून त्यांना सोडण्याची तारीख १३ मे असल्याचे पाकिस्तान सरकारकडून जाहीर केल्याचे सांगितले. ६०० मच्छिमारांपैकी २०० जणांची रिलीज ऑर्डरची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरीत ४०० जणांच्या रिलीज ऑर्डरची कार्यवाही सुरु असल्याचे सांगण्यात आले. यासाठी पाकिस्तान-इंडिया • पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रेसी, दक्षिण आशिया एकता गट, पाकिस्तान मच्छिमार संघटना यांच्यासह पाकिस्तानमधील राष्ट्रीय मानव हक्क आयोगाच्या अध्यक्षा राबिया जवेरी यांनी विशेष प्रयत्न केल्याचे एनएफएफ चे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी सांगितले.

एनएफएफ सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

यावर दोन्ही देशांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने एनएफएफ ने याप्रकरणी प्रथम सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. याबाबत फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी ४ मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजता दिल्ली येथे सभा घेतली. त्यानंतर दुपारी ३ वाजता सर्वोच्च न्यायालयाचे वकील कुरियाकोसे वर्गीस, त्यांचे सहाय्यक वकील अक्षत गंगोल व ईशा यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी एनएफएफ चे राष्ट्रीय उपाध्यक्ष रामकृष्ण तांडेल, दिल्लीचे अध्यक्ष विजयन, अखिल गुजरात मच्छिमार समाजाचे वेलजीभाई मसाणी, जेष्ठ पत्रकार जतीन देसाई, पोरबंदर मच्छिमार समाजाचे जीवनभाई जुंगी, पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रेसी च्या को-ऑर्डीनेटर एविता दास, दिल्ली येथील रोशनी रॉस व ऐश्वर्या बाजपेयी आदी उपस्थित होते.

Back to top button