महाराष्ट्रात हत्ती संवर्धनासाठी श्रीलंकेचे ‘रोल मॉडेल’ | पुढारी

महाराष्ट्रात हत्ती संवर्धनासाठी श्रीलंकेचे ‘रोल मॉडेल’

ठाणे; विश्वनाथ नवलू :  हत्तींचा सर्वाधिक उपद्रव असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडून कोल्हापूरच्या सीमारेषेपर्यंत हत्ती अभयारण्य होणार असून मानव आणि हत्ती संघर्ष टाळण्यासाठी श्रीलंकेच्या धर्तीवर नवे रोल मॉडेल हे अंमलात आणले जाणार आहे.

श्रीलंका हा देश तुलनेने पश्चिम महाराष्ट्रपेक्षा थोडा मोठा असेल. तरी तेथील जंगल,अभयारण्ये इत्यादी ठिकाणे अनेक आहेत. भारतात अभयारण्य बरीच आहेत. मात्र असे हत्तींसाठी संरक्षक जंगल फक्त केरळमधील कोट्टूर येथे व उत्तर प्रदेशमधील मथुरा जिल्ह्यात भारताचे पहिले आणि एकमेव ‘हत्ती संवर्धन आणि काळजी केंद्र’ 2010 साली स्थापन झाले आहे. कर्नाटकातल्या दांडेलीच्या जंगलातून 20 वर्षांपूर्वी सिंधुदुर्गातील दोडामार्ग येथे आलेल्या हत्तींनी आजवर पाच कोटींहून अधिक शेती बागायतीचे नुकसान केले आहे. तसेच या दहा वर्षांत या हत्तींनी सात माणसांचे बळी घेतले असून पाच-सहा जण जखमीही झाले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात सध्या ‘हत्ती हटाव’ मोहीम राबवण्याची जोरदार मागणी आहे. मात्र यापूर्वीच्या हत्ती हटाव मोहिमेत झालेले हत्तींचे मृत्यू यामुळे वनविभागाने हत्ती हटाव मोहीम बंद केली आहे.

हत्तींच्या या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी एक बैठक घेतली व या बैठकीत हत्ती अभयारण्याचा पर्याय पुढे आला. वीस वर्षांपूर्वी हे हत्ती आल्यानंतर स्थानिक लोकांना तो शुभशकून वाटला होता. मात्र त्यानंतर लगेचच हत्तींनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली. तत्कालीन वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्या संकल्पनेतून हत्ती परतवण्याची मोहीम राबवण्यात आली होती. दोरखंडाला मिरचीपूड लावायची, फटाक्यासारखे आवाज करायचे असे प्रयोग या मोहिमेत करण्यात आले. त्यानंतर हत्ती परत गेलेही, पण यातून प्रश्न सुटला नाही. उलट हा प्रश्न वाढत गेला.

Back to top button