उष्‍माघातातील रूग्‍णांची उद्धव ठाकरे, अजित पवारांनी घेतली भेट, सरकारवर टीका | पुढारी

उष्‍माघातातील रूग्‍णांची उद्धव ठाकरे, अजित पवारांनी घेतली भेट, सरकारवर टीका

पनवेल : पुढारी वृत्‍तसेवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी आलेल्या ११ श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला, तर काहींची प्रकृती ही चिंताजनक आहे. काल (रविवार) रात्री उशिरा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी  रूग्‍णालयात रुग्णांची भेट घेत त्‍यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

रविवारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची वेळ खराब होती आणि व्यवस्थापन चुकीचे होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोयीनुसार कार्यक्रम दुपारचा झाला असेल, तर कोण चौकशी करणार? असा प्रश्न उपस्थित करत अमित शहा यांना कार्यक्रमासाठी दुपारची वेळ हवी असेल, तर ते दुर्दैव आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी मध्यरात्रीनंतर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयाला भेट दिली. रविवारी नागपुरात वज्रमुठ सभेनंतर एमव्हीए नेते मध्यरात्रीनंतर रुग्णालयात पोहोचले. यावेळी त्यांनी आजारी असेलल्या रुग्णांची भेट घेत त्यांची चौकशी केली. तसेच शासनाच्या चुकीच्या नियोजनावर टीका देखील केली.

उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद साधतांना म्हणाले, या कार्यक्रमासाठी निवडलेली वेळ ही वेळ खराब होती. कार्यक्रमाचे नियोजन देखील चुकीचे होते. व्यवस्थापनात अनेक त्रुटी राहिल्या होत्या. हा कार्यक्रम जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोयीनुसार कार्यक्रम दुपारचा झाला असेल, तर या प्रकरणाची चौकशी कोण करणार ? अमित शहा यांना कार्यक्रमासाठी दुपारची वेळ हवी असेल तर ते दुर्दैव आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, कार्यक्रमाची वेळ खराब होती. सहभागींपैकी दोन व्हेंटिलेटरवर असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. जे झाले ते निष्काळजीपणामुळे झाले. ही घटना म्हणजे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमावर काळा डाग आहे. कार्यक्रम संध्याकाळी झाला असता तर हे झाले नसते, असे पवार म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button