ठाणे; विश्वनाथ नवलू : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि जुन्या महामार्गावर अपघात टाळण्यासाठी महामार्ग पोलिस आणि राज्य परिवहन विभागाकडून खबरदारी घेतली जाते; मात्र असे असतानाही अपघात आणि अपघातातील मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गतवर्षी जानेवारी ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत मुंबई-पुणे महामार्गावर 399 अपघातात 170 नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर अपघातात 292 गंभीर जखमी झाले होते. यावर्षी म्हणजेच जानेवारी ते एप्रिल 2023 या कालावधीतही अपघातांचे अर्धशतक झाले असून सुमारे 35 नागरिकांनी आपला प्राण गमावला आहे. जखमींचेही अर्धशतक झाले आहे. या वाढत्या अपघातांमुळे मुंबई- पुणे महामार्गावर मृत्यूचे तांडव सुरूच आहे.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटातील शिंग्रोबा मंदिराजवळ अवघड वळणावर शनिवारी पहाटे 4 च्या सुमारास झोपेत असलेल्या चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे प्रवासी बस थेट सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात बसमधील 13 प्रवासी ठार तर 28 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अशा भीषण अपघातांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व जुना महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून मृत्यूचे तांडव सुरूच आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर 168 अपघात झाले. या अपघातात 68 नागरिक मृत्युमुखी पडले तर 92 नागरिक गंभीर जखमी झाले होते. याशिवाय जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर याच कालावधीत231 अपघात झाले असून102 नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे तर 160 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. 2021 मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर 200 अपघातात 88 लोकांचा मृत्यू झाला होता. तर, 146 नागरिक गंभीर जखमी झाले होते. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर278 अपघातात 149 लोकांचा मृत्यू झाला होता. 144 नागरिक गंभीर जखमी झाले होते.
मुंबई-पुणे द्रुतगतिमार्ग नवी मुंबई शहराच्या कळंबोली ह्या नोडपाशी सुरू होतो. शीव पनवेल महामार्ग व रा. मा. 4 येथेच जुळतात. येथून साधारणपणे आग्नेय दिशेने धावत जाऊन हा मार्ग पुण्याबाहेरील देहू रोड येथे मुंबई-बंगलोर या राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 च्या बाह्यमार्गाला (बायपास) येऊन मिळतो. येथून वाहनांना पुण्याकडे अथवा पिंपरी-चिंचवडकडे जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सह्याद्री डोंगररांगेतून वाट काढण्यासाठी बोरघाटामध्ये एक्स्प्रेसवे व जुना महामार्ग एकत्र धावतात. ह्यामुळे जुन्या बोरघाटामधील अत्यंत तीव्र वळणे व खोल उतारांचा वाहनांना सामना करावा लागत नाही. गतिमार्गावरील वाहनांना बाहेर पडण्याचे केवळ 9 फाटे आहेत, शेडुंग, चौक, खालापूर, लोणावळा-1, लोणावळा-2, सोमाटणे (तळेगावसाठी), देहूरोड, रावेत (निगडीसाठी) व चिंचवड. मुंबई-पुणे गतिमार्गावर संपूर्ण लांबीदरम्यान प्रत्येक दिशेने 3 असे एकूण 6 पदर (लेन्स) आहेत. मार्गावर अनेक उड्डाणपूल व एकूण 6 बोगदे आहेत.
खालापूर व तळेगाव ह्या दोन ठिकाणी टोल नाके असून दुचाकी, तीन चाकी वाहने, ट्रॅक्टर, बैलगाड्या व पादचारींना गतिमार्गावर प्रवेश नाही. दख्खन आणि कोकण यांना जोडणार्या बोर घाटाच्या 1830 च्या मूळ बांधकामातील कमान म्हणजेच अमृतांजन पूल होय. हा पूल 2010 साली पाडला. 6 पदरी असलेला मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अमृतांजन पुलाच्या खाली 4 पदरी आहे. त्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. या पुलाचे खांब हे वाहतुकीस अडथळा ठरत होते. अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत. हा ऐतिहासिक पूल वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे कारण देत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने हा पूल पाडायचा निर्णय घेतला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीस अमृतांजन पुलाचा अडथळा होत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा पूल पाडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पूल पाडण्याचे नियोजन सुरू होते, मात्र महामार्गावरील वाहनांच्या सततच्या प्रचंड संख्येमुळे ते शक्य होत नव्हते.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या टाळेबंदीमुळे महामार्गावरील रोडावलेल्या वाहन संख्येने पूल तोडण्याची संधी गवसली. याचा फायदा घेत ऐतिहासिक महत्त्व असलेला हा पूल 5 एप्रिल 2020 रोजी नियंत्रित स्फोटाने पाडण्यात आला. अमृतांजन पुलाचे एकूण 4 गाळे पाडण्यात आले. स्फोटक लावण्यासाठी प्रत्येक खांबाला प्रत्येकी एक मीटर अंतरावर आणि दोन मीटर आत खोलवर अशी 40 ते 45 छिद्रे पाडून एकूण 300 किलो जिलेटीन स्फोटकांचा वापर हा पूल पाडण्यासाठी करण्यात आला.
सुरू झाल्यापासून एक्स्प्रेसवेवर अपघातांचे प्रमाण कायम जास्त राहिले आहे. 2002-12 या 10 वर्षांच्या काळादरम्यान ह्या मार्गावर 1,758 अपघातांची नोंद झाली. भक्ती बर्वे, आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे इत्यादी लोकप्रिय मराठी अभिनेते या गतिमार्गावरील अपघातांमध्ये मृत्युमुखी पडले. 18 जुलै, 2015 रोजी आडोशी बोगद्याच्या मुखाशी दरड कोसळून तीन व्यक्तींचा मृत्यू झाला.