

भाईंदर: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून काशिमिरा येथील ऐतिहासिक जरीमरी तलावाकाठी साकारलेल्या ५१ फूट उंच श्री विठ्ठल मूर्तीचा अनावरण सोहळा गुरुवार, दि. २५ जून रोजी निर्जला एकादशीच्या मुहूर्तावर सायंकाळच्या सुमारास मोठ्या भक्तीभावाच्या वातावरणात पार पडला.
यावेळी विठ्ठलभक्त व वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वारकऱ्यांना वाढत्या वयामुळे किंवा विविध कारणांमुळे पंढरपूरची वारी करणे शक्य होत नाही.
अशा भाविकांच्या मनातली आर्त हाक ओळखून, भाव तिथे देव या उक्तीप्रमाणे, लाडक्या विठ्ठलाला मिरा-भाईंदरमध्येच आणण्याची संकल्पना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली.
यापूर्वी त्यांनी भाईंदर पूर्वेच्या नवघर तलाव येथे ५१ फुटी विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. त्यानंतर काशिमिरा येथील जरीमरी तलावाकाठी ५१ फुटी श्री विठ्ठलाच्या दुसऱ्या मूर्तीचा अनावरण सोहळा गुरूवारी पार पाडला. यामुळे मिरा-भाईंदरकरांसाठी जणू भूतलावरील वैकुंठच अवतरल्याचा अनुभव उपस्थितांना आला.
गेल्या १८ वर्षांपासून सरनाईक यांचे वारकरी संप्रदाय व विठ्ठल भक्तांसाठी कार्य केले. अखंड हरिनाम सप्ताहाच्या आयोजनासह दैनिक हरिपाठ, बालकांमध्ये संस्कार रुजवण्यासाठी कीर्तन-प्रवचन वर्ग व वारकरी शिक्षण संस्था आदी कार्यक्रमांचे आयोजन केले.
त्यांच्या प्रयत्नातून वारकरी संप्रदायासाठी शहरात वारकरी भवन साकारण्यात आले असून याच वारकरी संप्रदायाच्या विठ्ठल भक्तीची ओढ लक्षात घेऊन त्यांनी गुरुवारी ५१ फुटी श्री विठ्ठल मूर्ती जरीमरी तलावाकाठी साकारून विठ्ठल भक्तांना आगामी आषाढी एकादशीची अमूल्य भेट दिल्याने वारकरी संप्रदायाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
वारकरी भजन मंडळाच्या सुरेल अभंगवाणीसह टाळमृदूंगाच्या गजरात विठ्ठलाच्या जयघोषाने या भव्य मूर्तीचा अनावरण सोहळा पार पाडण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर भक्तीमय होऊन त्याच वेळी आकाशात फटाक्यांच्या नयनरम्य आतिषबाजीने या सोहळ्याची भव्यता वाढविली.
विठू माऊलीचे विलोभनीय रूप पाहुन अनेक भाविकांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते. या ऐतिहासिक क्षणाची मिरा-भाईंदर शहराच्या वैभवात भर पडली असून या भव्य मूर्तीमुळे पुढील पिढ्यांना भक्तीची व ऊर्जेची प्रेरणा मिळेल, अशी भावना सरनाईक यांनी व्यक्त केली.