

बदलापूर : पुढारी वृत्तसेवा : कुळगाव बदलापूर नगर पालिका हद्दीतील वालीवली येथील बदलापूर नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर अंबरनाथ आणि उल्हासनगर महापालिकेचा कचरा आणून टाकण्याचा घाट घातला जात आहे. या प्रकल्पाला बदलापूर महाविकास आघाडीने कडाडून विरोध केला आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीने आज (दि.७) आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. हे आंदोलन उग्ररूप धारण करू नये किंवा उग्र रूप धारण केल्यास आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. तसेच अश्रूधुरांच्या नळकांड्यासह पोलिसांनाही सुसज्जपणे तैनात केले होते.
बदलापूर पश्चिम परिसरात सकाळी 11 वाजता महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र जमून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. प्रकल्पाचा आराखड्याची होळी करत या प्रकल्पाला विरोध केला. बदलापुरातील वालीवली डम्पिंग ग्राउंडवर एकही गाडी फिरकू न देण्याचा निर्धार यावेळेस महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी केला.
या आंदोलनात ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ऋता आव्हाड, काँग्रेसचे अध्यक्ष संजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, ठाकरे गटाचे शहराध्यक्ष किशोर पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस कालिदास देशमुख, राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांच्यासह वालीवली येथील स्थानिक ग्रामस्थ, तरुण मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांनी श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री यांच्या एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत या प्रकल्पाला कडाडून विरोध केला.
हा प्रकल्प रद्द न झाल्यास यापुढील काळात मुंबई हायकोर्टात रिट पिटीशन दाखल करून याहूनही अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी दिला. तर आजकाल विरोध केल्यामुळे एखादा प्रकल्प रेटून नेण्याची फॅशन आल्याची टीका ऋता आव्हाड यांनी करत राज्य शासनाने हा प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणी केली.
हेही वाचा