धावत्या सिंहगड एक्स्प्रेसमध्ये घृणास्पद प्रकार; व्हिडीओ शूट करत काढली महिलांची छेड | पुढारी

धावत्या सिंहगड एक्स्प्रेसमध्ये घृणास्पद प्रकार; व्हिडीओ शूट करत काढली महिलांची छेड

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : शाळा, महाविद्यालय, असो वा मदरसा… विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच सामाजिक निती-नियमांचे धडे देण्याची जबाबदारी तेथील शिक्षकाची असते. मात्र स्वतः कडूनच सामाजिक नितीमूल्ये पायदळी तुडविणाऱ्या महाभागांमध्ये शिक्षकांचाही समावेश असल्याचे एका घटनेतून चव्हाट्यावर आले आहे. एक्स्प्रेसमध्ये बसलेल्या महिला प्रवाशांचे मोबाईलमधून लपून-छपून व्हिडिओ काढणाऱ्या विकृताला इतर प्रवाशांनी पकडून बेदम चोपल्याची घटना गुरुवारी सकाळी पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसमध्ये घडली. मोहम्मद अश्रफ असे या विकृतालाचे नाव असून तो एका मदरशामध्ये शिक्षक म्हणून नोकरी करत असल्याचेही समोर आले आहे. या विकृताला संतप्त प्रवाशांनी चोपून कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या हवाली केले.

लोहमार्ग पोलिसांनी विकृताच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला गजाआड केले. हा संपूर्ण प्रकार मध्य रेल्वे मार्गावरील पुणे-कर्जत स्थानकांदरम्यान घडल्यामुळे हे प्रकरण कर्जत लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. गेल्या दोन- तीन दिवसांपासून सिंहगड एक्स्प्रेसने ये-जा करत असताना सहप्रवासी महिलांचे व्हिडिओ हाच इसम मोबाईलमधून शूट तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

गुरूवारी सकाळी पुण्याहून मुंबईकडे येण्यासाठी निघालेल्या सिंहगड एक्स्प्रेसमध्ये एक इसम या डब्यातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे चोरी-छुपे व्हिडिओ शूट करत असल्याची बाब याच डब्यातून प्रवास करणाऱ्या अन्य प्रवाशांच्या लक्षात आली. तू कोण आहेस आणि हे कशासाठी करतो आहेस, असा प्रवाशांनी त्याला जाब विचारला. मात्र त्याने प्रवाशांना उलटसुलट उत्तरे दिली. त्यामुळे डब्यात वातावरण तापले. संतप्त प्रवाशांनी या इसमाला चांगलाच चोप देऊन पकडून ठेवले. सिंहगड एक्स्प्रेसमधून रोज पुणे-मुंबई दरम्यान नोकरदार प्रवासी मोठ्या संख्येने ये-जा करत असतात. मागील काही दिवसांपासून हा विकृत इसम अशा प्रकारे या एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करत असल्याचे या प्रवाशांनी पाहिले होते. अखेर गुरूवारी सकाळी या एक्स्प्रेसमधून प्रवास करणारे प्रवासी संधीची वाट पाहत होते. हा इसम त्याच्याकडील मोबाईलमधून तेथे बसलेल्या महिलांचे व्हिडिओ शूट करत होता. हे पाहून त्या महिला खजील झाल्या. त्यांनी हा प्रकार अन्य प्रवाशांच्या निदर्शनास आणून दिला. प्रवाशांनी या इसमाला जाब विचारला. मात्र हा इसम प्रवाशांशी उद्धटपणे बोलू लागला. तुम्हाला काय करायचे आहे ? माझा मोबाईल आहे, मी कुणाचेही फोटो काढू शकतो, शूटिंग करू शकतो, असे काहीसे बोलणाऱ्या या इसमाच्या घृणास्पद कृत्यामुळे डब्यातील वातावरण तापले.

यावर संतप्त प्रवाशांनी रंगेहाथ पकडून यथेच्छ झोडपले आणि त्याला कल्याण स्थानकावर उतरवून लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. या महिलांसह प्रवाशांनी या विकृताच्या नीच कृत्याची पोलिसांना माहिती दिली. महिलांचे व्हिडिओ शूट करून हा बदमाश काहीतरी घृणास्पद कृत्य करणार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी या इसमावर कठोर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Back to top button