ठाकरे कुटुंबीयांकडून रोशनी शिंदे यांची रूग्णालयात भेट | पुढारी

ठाकरे कुटुंबीयांकडून रोशनी शिंदे यांची रूग्णालयात भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केलेल्या ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांची रश्मी ठाकरे यांनी ठाण्यातील रूग्णालयात भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही त्यांच्यासोबत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नीविषयी सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप करीत शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला केला. त्‍यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, जखमी रोशनी यांची विचारपूस करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहपत्निक रुग्णालयात जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

शिंदे गटाचे बाळा गवस यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर त्याला रोशनी शिंदे यांनी प्रतिउत्तर दिले. या प्रकरणावरून वाद वाढण्याची चिन्हे दिसू लागताच रोशनी शिंदे यांनी माफी मागितली. मात्र, सोमवारी रात्री आठच्या सुमारास शिंदे गटाच्या काही माजी नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांनी कासारवडवली येथील टाटा मोटर्सच्या कार्यालयात जाऊन रोशनी शिंदे यांना  मारहाण केली.

याप्रकरणी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे, रेखा खोपकर यांच्या सह महिलांनी जखमी शिंदे यांना घेऊन पोलीस ठाणे गाठले. मात्र, गुन्हा दाखल करून घेण्यास कासारवडवली पोलिसांनी नकार दिला. काही वेळानंतर लेखी तक्रार घेतली. जखमी शिंदे यांना पोलीस ठाण्यात चक्कर आणि उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या गर्भवती राहण्यासाठी उपचार घेत आहेत, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. तर हा दावा शिंदे गटाने फेटाळून लावला आहे. रोशनी शिंदे नेहमीच मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात पोस्ट करत असते. त्यांचा भांडाफोड वैद्यकीय अहवाल आल्यानंतर होईल, असे शिंदे गटाने म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकरणी खासदार राजन विचारे आणि दिघे यांनी संताप व्यक्त करीत शिंदे यांचे काही बरे वाईट झाल्यास त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलिस आयुक्त जबाबदार राहतील, असा इशारा दिला आहे.

Back to top button