टेंभा गावात हिंदू-मुस्लीम एकत्र येऊन रामनवमी साजरी करण्याची परंपरा कायम

शहापूर; पुढारी वृत्तसेवा : शहापूर तालुक्यातील खर्डी परिसरातील वैतरणा नदीच्या किनारी वसलेले टेंभा हे एक छोटंसं गाव असून याठिकाणी १९४८ पासून रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. गावातील तात्कालीन जेष्ठ नागरिक दिवंगत बाबू घोडविंदे, पांडुरंग घोडविंदे, रामभाऊ सतकर, दगडू घोडविंदे, नथु घोडविंदे, बेंडू कोर, शिडू ढमके, भागवत घोडविंदे, छगन उबाळे, गोविंद वाढविंदे व याकूब ठाणगे यांनी एकत्र येऊन हा रामजमोत्सव चालू केला. तो आजपर्यंत पुढच्या पिढीने सुद्धा चालू ठेवला आहे.
या लाकडी राममंदिरात १९४८ साली मंडप टाकून हा कार्यक्रम सुरु करण्यात आला. तात्कालीन माजी आमदार महादू बरोरा यांनी समाजगृह दिल्याने सदर मंदिराचे रूपांतर पक्क्या मंदिरात झाले. परंतु आजही या मंदिरावर कौलारू छप्पर आहे. या ठिकाणी सर्वधर्म समभाव ही परंपरा टिकवली असून विशेष म्हणजे हिंदू – मुस्लिम एकत्र येऊन ७५ वर्षापासून रामनवमी मोठ्या भक्ती भावाने साजरी करतात. यावर्षी ३० मार्च रोजी हा उत्सव साजरा होणार असून १० वाजता अभिषेक, दुपारी १२ वाजता श्रीराम जन्म व महाआरती दुपारी १ वाजता सत्यनारायणाची महापूजा ३ वाजता पालखी सोहळा व श्रीरामाची भव्य मिरवणूक, रात्री ८ वाजता महाप्रसाद ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. यासाठी स्थानीक युवा वर्ग मेहनत घेत आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर बांधण्याचं काम सुरू आहे. त्यासाठी लागणारे लाकूड महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातून पाठवले जाणार आहे. टेंभा येथील मंदिर ज्या खासदारांच्या लोकसभा क्षेत्रात येतं ते आज केंद्रात मंत्री असूनही त्यांना या ठिकाणच्या पुरातन श्रीराम मंदिराचा विसर पडला असल्याची ग्रामस्थांची खंत आहे. साधं समाज मंदिरही मागणी करून मंजूर करू शकले नाही. राजकारणासाठी श्रीरामचं | नाव घ्यायचे आणि प्रत्यक्षात मात्र त्यांना विसरायचं हे दृश्य सध्या या ठिकाणी पहावयास मिळते. तसेच शहापूर मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना या गावाचा विसर पडला असून निवडून आल्यावर एकदाही त्यांचे पाय या मंदिराला लागले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.