ठाण्यात ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझाने घेतला पहिला बळी | पुढारी

ठाण्यात ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझाने घेतला पहिला बळी

ठाणे,  पुढारी वृत्तसेवा : ठाणे महापालिका क्षेत्रात ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या विषाणूने पहिला बळी घेतला आहे. मृत झालेल्या व्यक्तीचे वय ७९ वर्ष असून त्याचा एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरीकडे शहरात कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढत असून कोरोनामुळेही गेल्या १० दिवसांमध्ये ३ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कमी झालेला करोनाचा संसर्ग गेल्या पंधरा दिवसांपासून पुन्हा वाढू लागला आहे. जिल्ह्यात कोरोना सक्रीय रुग्णसंख्या ३०६ इतकी झाली आहे. त्यापैकी २०६ रुग्ण हे एकट्या ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत, तर कल्याण-डोंबिवली शहरात २५, नवी मुंबई शहरात २८, उल्हासनगर शहरात ३, भिवंडी शहरात १८, मिरा-भाईंदर शहरात १० आणि ग्रामीण भागात १६ इतके सक्रीय रुग्ण आहेत.

रुग्णसंख्येत आघाडीवर असलेल्या ठाणे शहरात गेल्या दहा दिवसांत दोन वृद्धांचा मृत्यू झालेला असून, त्यापाठोपाठ बुधवारी आणखी एका ७९ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यांना सहव्याधी होत्या. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांना ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचीही लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालातून उघड झाले होते. त्यामुळे आठवडाभरात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तीन इतकी झाली असून त्याचबरोबर ‘एच ३ एन २’चा पहिला मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

शहरात इन्फ्ल्युएंझाचे १९ रुग्ण…

ठाणे शहरात करोना रुग्णसंख्येत वाढ होण्याबरोबरच ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या संसर्गजन्य विषाणूने डोके वर काढले असून, याचे आत्तापर्यंत १९ रुग्ण शहरात आढळून आलेले आहेत. त्यातच बुधवारी यामुळे एकाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button