ठाण्यात इन्फ्लूएंझाचे सहा रुग्ण सापडले | पुढारी

ठाण्यात इन्फ्लूएंझाचे सहा रुग्ण सापडले

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे महापालिका क्षेत्रात इन्फलुएंझा या आजाराचे सहा रुग्ण आढळून आले आहे. घसा दुखणे, नाक वाहणे किंवा चोंदणे, ताप येणे, थकवा जाणवणे अशी कोविडसदृश्य लक्षणे असून अशी लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीने जवळच्या आरोग्यकेंद्रात संपर्क साधावा तसेच आवश्यक त्या तपासण्या कराव्यात, असे आवाहन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे. दुसरीकडे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले असून यामुळे आता ठाणे महापालिकेची यंत्रणा अलर्ट झाली आहे. आतापर्यंत दिवसाला केवळ १ हजार होणाऱ्या चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली असून दररोज २,५०० चाचण्या केल्या जाणार आहेत. याशिवाय पालिकेच्या कळवा रुग्णालयामध्ये विलगीकरण कक्ष देखील सज्ज करण्यात आला असून सध्या महापालिका क्षेत्रात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या ही ८५ असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येने उसळली घेतली आहे. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ४० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये २८ रुग्ण हे ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात नोंदवले गेले होते. मात्र आता ठाणे महापालिका क्षेत्रातील हाच आकडा आता ८५ वर गेला आहे. ठाणे पालिका क्षेत्रातील वाढती रुग्णसंख्या पाहता निम्म्याहून अधिक सक्रिय रुग्ण ठामपा हद्दीत उपचारार्थ दाखल आहेत. त्यामुळे आता वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी पालिकेची यंत्रणा सतर्क झाली असून शहरात चाचण्या वाढवण्याचे निर्देश बांगर यांनी दिले आहेत. शुक्रवारी आरोग्य विभागांची वाढत्या रुग्णसंख्येसंदर्भात एक महत्वाची बैठक झाली.

ठाण्यात कोरोना आटोक्यात आल्यानंतर कोरोनासाठी जो स्टाफ होता त्या स्टाफला आता पुन्हा या कामासाठी वर्ग करण्यात आले आहे. दुसरीकडे गर्दीच्या ठिकाणी २४ तास आरटीपीसीआर सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरटीपीसीआर चाचण्याही करण्यात याव्यात. एखादा रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची चाचणी करण्यात यावी. त्यांनी चाचणी करण्यास नकार दिला तर सहाय्यक आयुक्तांनी पथकासह घरी जाऊन त्यांची चाचणी करावी. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही चाचणी करण्यात यावी. बाधित रुग्णांसाठी घरात स्वतंत्र खोली आणि शौचालयाची व्यवस्था उपलब्ध नसेल तर त्यांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात यावे. डायलेसीस सुरु असलेल्या व्यक्ती करोनाबाधित झाला तर, त्याला कळवा रुग्णालयातील उपचाराच्या ठिकाणी डायलेसीसची व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी, अशा सुचनाही त्यांनी केल्या.

Back to top button