ठाणे : सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या चौकशीला सुरुवात | पुढारी

ठाणे : सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या चौकशीला सुरुवात

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे महापालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची अखेर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी सुरु केली आहे. आहेर यांची गुरुवारी तब्बल तासभर चौकशी केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. महेश आहेर यांच्या विरोधात माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. तर ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी देखील आहेर यांच्यापासून आपल्याला धोका असल्याचे सांगत पोलीस आयुक्त जयजित सिंह यांना पत्र दिले होते.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीकडून आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यात आव्हाड यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या ऑडिओ क्लिपनंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर माहराण केली होती. त्यानंतर आव्हाड यांच्यासह त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आहेर यांच्याविरोधात कारवाईची मागणी देखील राष्ट्रवादीने पोलिसांकडे केली होती. परंतु त्यांची साधी चौकशी देखील करण्यात आली नव्हती. दुसरीकडे आव्हाड यांनी आहेर यांच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. परंतु एवढे होऊनही आहेर यांच्या विरोधात कारवाई न झाल्याने अखेर आव्हाड यांनी या संदर्भातील मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत केली जाईल, असे आश्वासन दिले होते.

दरम्यान, दुसरीकडे ठाणे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या कुटुंबियांना देखील आहेर यांच्याकडून धोका असल्याचा आरोप केला होता. तसेच या संदर्भातील पत्र देखील त्यांनी पोलिसांना दिले होते. त्यानंतर आता सीआयडी बरोबरच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून आहेर यांची चौकशी सुरु झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गुरुवारी आहेर यांना चौकशीसाठी बोलावले होते. सुमारे तासभर आहेर यांची चौकशी करण्यात आली. विक्रांत चव्हाण यांनी केलेल्या आरोपांविषयी ही चौकशी करण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

हेही वाचा 

Back to top button