सुपरमॅक्स कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार | पुढारी

सुपरमॅक्स कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

ठाणे; दिलीप शिंदे : भारतासह जगभर ब्लेडचा पुरवठा करणारी सुपर मॅक्स ( पनामा) या ठाण्यातील ७२ वर्ष जुन्या कंपनीला अडीच महिन्यापासून टाळे लावण्यात असून सुमारे दोन हजार कामगार रस्त्यावर आले आहेत. राज्यातील नवे उद्योग, कंपन्या राज्याबाहेर जात असताना सुपर मॅक्स बंद करून कंपनीची आठ एकर जमिनीची विक्री केली जाणार आहे. ही कंपनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील असून त्यांनी नेमलेल्या दोन प्रतिनिधींनी बुधवारी कंपनीत येऊन कामगार आणि व्यवस्थापनाशी चर्चा केली. अधिवेशन संपल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री शिंदे हे कामगारांशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

ठाण्यातील विद्युत मेटॅलिक अर्थात सुपरमँक्स (पनामा टोपज) कंपनीची स्थापना १९४९ मध्ये आर के मल्होत्रा यांनी केली होती. ठाण्यातील मोक्याची ठिकाणी आठ एकर जागेवर असलेल्या या कंपनीची सुमारे ८०० कोटींची उलाढाल होती. या कंपनीचे ब्लेड जगभर पाठविले जातात. अशी ही कंपनी २०११ मध्ये मल्होत्रा यांच्याकडून त्यांना फायनान्स करणाच्या लंडनस्थित ऍक्टिसने ताब्यात घेतली
आणि कंपनीला उतरती कळा लागली. कंपनीने टाळेबंदी जाहीर केली तेव्हा कंपनीची २५० कोटींपेक्षा अधिकची उलाढाल आणि चार शिफ्टमध्ये ११५७ कायमस्वरूपी कामगार, व्यवस्थापनातील कर्मचारी, अधिकारी, कंत्राटी कामगार, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक मिळून सुमारे दोन हजार कर्मचारी कार्यरत होते.

कोरोना महामारीनंतर कंपनीचे संचित तोटा अधिकच वाढत राहिले आणि पगारासाठी कामगार आणि व्यवस्थापनामध्ये संघर्षांची ठिणगी पडू लागली. थकलेल्या पगार, बोनसवरून संतप्त कामगारांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अनेकदा आंदोलने करीत सीईओसह अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले होते. पोलिसांच्या मदतीने ते अधिकारी स्वतःची सोडवणूक करून घेत असत. दिवाळीत बोनस तर नाहीच पगार देखील न झाल्याने कामगारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर धाव घेऊन त्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या दोन प्रतिनिधींनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली. मात्र काही उपयोग झाला नाही. अखेर कंपनीने २१ नोव्हेंबर रोजी कामगारांना टाळेबंदीची नोटीस बजावली. कंपनीला होणारा संचित तोटा, कामगारांच्या आक्रमक भूमिका, शिवीगाळ, मारहाणीचे प्रकार आणि इतर कामगारांना काम करू न देण्याच्या भूमिकेमुळे ५ डिसेम्बरपासून सुपर मॅक्स कंपनीला टाळे लावले.. त्यामुळे सुमारे दीड हजार कामगारांचे संसार उघड्यावर आले आहेत.

Back to top button