वेबसाईटला रेटिंग, रिव्ह्यूच्या नावाने फसवणूक | पुढारी

वेबसाईटला रेटिंग, रिव्ह्यूच्या नावाने फसवणूक

ठाणे; संतोष बिचकुले :  ऑनलाईन लुटण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरणाऱ्या भामट्यांनी आता गुगलवरील वेबसाईटला रेटिंग, रिव्ह्यू देण्याच्या नावाखाली फसवणुकीला सुरुवात केली आहे. अशाच प्रकरच्या गुन्ह्याची उकल मुंबईच्या व्ही. पी. रोड पोलिसांनी केली. सदर गुन्ह्यातील आरोपी संजय सिंह सुरेंद्र सिंह चौहान (२४), रणवीर सिंह बजरंग सिंह शेखावत (२२), आयुष संजय राठोर (२३) यांना मध्य प्रदेशात (एमपी) जाऊ न बेड्या ठोकण्यात आल्या. या आरोपींना १० मार्च रोजी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पती गमावलेली महिला भविष्याच्या अनुषंगाने जमा पैशांमध्ये वाढ होण्याकरिता गुंतवणुकीच्या शोधात होती. नेमके त्याचवेळी तिला घर बसल्या पैसे कमावण्याच्या संधीकरिता फोन आला. गुगलवर रिव्हयू व रेटिंगच्या मोबदल्यात पैसे मिळणार असल्याने महिला भामट्यांच्या जाळ्यात सहज अडकली.

सुरुवातीला टेलिग्राम, व्हॉट्सअॅपवर भामट्यांनी विशेष लिंक पाठवल्या. त्यावर रेटिंग व रिव्ह्यू दिल्यानंतर महिलेला सुरुवातील हजारो रुपये मिळाले. मात्र सदर रक्कम बँक खात्यात घेण्यासाठी पेड टास्क खेळण्यास भामट्यांनी भाग पाडले. त्याकरिता तिने ५० हजार रुपये ऑनलाईन भामट्यांच्या खात्यात जमा केले. सदर टास्क महिला जिंकल्याने रकमेत आणखी वाढ झाली. अनेकदा जिंकलेली रक्कम व टास्कसाठी भरलेले ५० हजार परत मिळवण्यासाठी भामट्याने आणखी पैसे भरण्यास भाग पाडले. अशा प्रकारे चार वेळा टास्क खेळण्यासाठी महिलेने २ लाख ५ हजार रुपये भरले. मात्र तिला सदर रक्कम देण्यास टाळाटाळ होऊ लागली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने तत्काळ गिरगाव येथील व्ही. पी. रोड पोलीस ठाणे गाठले.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास तांत्रिक माहितीच्या आधारे केला असता आरोपी मध्य प्रदेशात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार उपायुक्त अभिनव देशमुख, एसीपी रवी सरदेसाई, वपोनि किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि राहुल पाटील, अंमलदार संकेत तावडे, प्रतीक शिर्के, मुन्ना सिंह यांनी मध्य प्रदेश गाठले व आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

     मुंबई, बंगळुरू, तेलंगणातील चार गुन्ह्यांची उकल

  • ऑनलाईन फसवणूक करणारे आरोपी हाती लागल्याने मुंबईतील २ तर बंगळुरू, तेलंगणातील प्रत्येकी १ असे ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
  •  या आरोपींकडून १९ बोगस बँक खात्यांचा डाटा पोलिसांनी जप्त केला असून त्यात लाखो रुपयांचे ट्रान्झेक्शन झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन व्ही. पी. रोड पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Back to top button