ठाणे : २० वर्ष झाली तरी महिलांसाठी केवळ एकच लोकल ट्रेन

डोंबिवली; भाग्यश्री प्रधान : जरा आत चला रे.. मला जागा नाही.. जाऊ दे ही ट्रेन सोडते. पण पुढल्या ट्रेनमध्ये पण अशीच गर्दी असेल अशी ओरड रोज सकाळ- संध्याकाळ रेल्वे स्थानकातून ऐकू येत असते. आपल्या जीवावर उदार होऊन ती आपल्या घरासाठी, स्वतः च्या कर्तृत्वासाठी आणि परिस्थितीवर मात मिळविण्यासाठी धडपडते. रोज सकाळी हे दृश्य सारेच बघत असेल तरी रेल्वे प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी अद्यापही झोपेचे सोंग घेतल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षात नोकरदार महिलांची संख्या वाढली असली तरी रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी केवळ गेल्या २० वर्षात महिलांसाठी केवळ एकच रेल्वे सोडली जात आहे. इतकेच नव्हे तर महिला डब्यांची संख्या वाढावी यासाठी महिला प्रवासी संघटनेकडून आवाज उठवला जात आहे. कोरोनानंतर अनेक महिलांना घरातील आर्थिक परिस्थितीमुळे नोकरी करणे गरजेचे आहे. या महिला नोकरी, व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करत असताना शासनाने त्यांच्या या कष्टाला प्रोत्साहन द्यावे अशी मागणी महिला वर्ग करताना दिसत आहे. सध्या ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण ही मध्य रेल्वेची महत्वाची आणि गर्दीची ठिकाण आहेत.
सध्या महिला चाकरमान्यांची संख्या वाढल्याने महिला रेल्वे प्रवाशांची संख्या देखील वाढली आहे. १०० महिलांची क्षमता असलेल्या एका डब्यात सध्या जवळपास ६०० ते ७०० महिला रोज प्रवास करत आहेत. बसण्यासाठी जागा नसतेच मात्र निदान व्यवस्थित उभे राहता यावे यासाठी या महिला रेल्वे डब्यात चढण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. महिलांसाठी एक खास रेल्वे मध्य रेल्वेने २० वर्षापूर्वी सुरू केली मात्र त्या रेल्वेला प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते. त्यामुळे आता आणखी एक रेल्वे महिला प्रवाशांसाठी सुरू करावी अशी मागणी महिला करत आहेत.
एसी लोकल सुरू झाल्या मात्र परतीचे काय?
मध्य रेल्वेने एसी लोकल सुरू केल्या. सकाळी या लोकलने जाऊ मात्र येताना एसी लोकल त्या वेळेत मिळत नाही. एसी लोकलचे वेळापत्रक वेगळे आहे. त्यामुळे त्याचा फारसा फायदा होत नसल्याचे प्रवासी महिलांनी दै. पुढारीशी बोलतांना सांगितले.