अवकाळीने हापूसच्या उत्पादनात 60 टक्क्यांनी घट | पुढारी

अवकाळीने हापूसच्या उत्पादनात 60 टक्क्यांनी घट

ठाणे; विश्वनाथ नवलू :  हापूस ही कोकणची मूळ ओळख आहे. कोकण हापूसला ऐतिहासिक, शास्त्रीय आधार आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवणारा, आकार आणि रंगांनेही आम्रप्रेमींना आकर्षित करणारा कोकणातला हापूस यंदा अवकाळी पाऊस, उष्म्यासारखे वातावरणातील प्रतिकूल बदल यामुळे आर्थिक उलाढालीत मात्र बॅकफूटवर गेला आहे. कोकण पट्ट्यात जवळपास 5 हजार कोटींची उलाढाल असलेल्या हापूस आंब्याला अवकाळी पावसाचा बसलेला तडाखा यामुळे आतापर्यंत 40 टक्केच पिक हाताशी आले असून 60 टक्यांनी उत्पादन घटले आहे.

यंदाही मँगोनेट, अ‍ॅमेझॉनवरील आंबा उपलब्धेमुळे 20 टक्के हापूस परदेशात पोहोचला. 25 हजार रुपये पेटीपासून आतापर्यंतचा भाव चार ते पाच हजारांपर्यंत खाली आला आहे. मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्यात हा हापूस 15 एप्रिलनंतरच येणार आहे. देवगड, रत्नागिरी, अलिबाग हा हापूसचा बेल्ट हंगामात शेतकर्‍यांना एकरी 2 लाख उत्पन्न मिळवून देतो. मात्र, अवकाळी पावसाबरोबरच उष्म्यासारखे वातावरणातील बदल यामुळे दरवर्षी मिळणारे एकरी 2 लाख रुपये उत्पन्न यावर्षी 1 लाखापर्यंत खाली आलेे. गेल्या आठवड्यापासून वाशी मार्केटमधील आवक मंदावली आहे. कोकणातून सुमारे 10 ते 12 हजार पेट्या विक्रीसाठी येत आहेत.

       हापूस उत्पादनातील घटीची कारणे

  • यावर्षी पावसाळा लांबल्याने पालवीचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये आलेल्या मोहोराचे शेतकर्‍यांनी रक्षण केल्याने त्याचा आंबा बाजारात आला. मात्र, या वर्षी थंडी जानेवारीपासून सुरू झाली, शिवाय थंडीचे प्रमाण कमी असल्याने फारसा मोहोर झाला नाही. त्यामुळे एकूणच आंबा उत्पादन कमी आहे.
  •  अवकाळी पाऊस, उच्चतम तापमानाचा फटका आंबा पिकाला बसला. अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे आंब्याचे नुकसान झाले. गारपिटीच्या मार्‍यामुळे आंब्यावर काळे डाग पडून आंबा खराब झाला, शिवाय गेल्या आठवड्यात तापमानातील उच्चांकामुळे आंबा भाजला.

अवकाळी पावसाने यंदा मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी आंबा उत्पादन कमी असून, त्या तुलनेत शेतकर्‍यांना दर उपलब्ध होत नाहीत. खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत होणारा खर्च लक्षात घेता, दर स्थिर राहणे अपेक्षित आहे.
– अयोध्याप्रसाद गावकर, आंबा बागायतदार, देवगड, सिंधुदुर्ग

Back to top button