मुख्यमंत्री शिंदे यांची कुटुंबीयांसोबत धुळवड साजरी | पुढारी

मुख्यमंत्री शिंदे यांची कुटुंबीयांसोबत धुळवड साजरी

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  नैसर्गिक रंगाचा वापर करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाण्यातील निवासस्थानी कुटुंबीयांसोबत धुळवड साजरी केली. आपला लाडका नातू रूद्रांशकडून मात्र रंग लावून घेण्याचा मोह मुख्यमंत्र्यांना यावेळी आवरता आला नाही. स्वतः नैसर्गिक रंगाचा वापर करून धुळवड साजरी करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी, सर्वांनीच नैसर्गिक रंगाचा वापर करण्याचे आवाहन नागरिकांना केले. तर महायुतीचे सरकार राज्यात आल्यानंतर सर्वच सण उत्साहात साजरे केले जात असल्याचे पुन्हा एकदा त्यांनी आवर्जून सांगितले.

ठाण्यात सर्वच ठिकाणी धुळवडीचा उत्साह पाहायला मिळाला. विशेष करून ठाण्यात झालेल्या राजकीय धुळवडीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील पहिलीच धुळवड असल्याने ठाण्यातील त्यांच्या शुभ दीप या निवासस्थानी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी यावेळी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी धुळवडीचा मनसोक्त आनंद लुटला. राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वच सण उत्साहात आणि आनंदात साजरे केले जाऊ लागले. दहीहंडी, गणेशोत्सव, दिवाळी आणि आता होळीपाठोपाठ धुलिवंदन सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांनी राज्यातील जनतेला होळी आणि धुलिवंदनाच्या यावेळी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका येथील आनंद आश्रमाला भेट दिली. यावेळी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांना अभिवादन करून त्यांच्या तसबीरीवर रंग उधळून धुळवडीचा सण साजरा केला. त्यानंतर आनंद आश्रमात जमलेल्या शिवसैनिकांनाही शुभेच्छा दिल्या.

50 खोक्यांवर आव्हाडांची होळीच्या उत्सवात घोषणाबाजी…

माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी होळीनिमित्त पुन्हा एकदा 50 खोक्यांवर घोषणाबाजी केली आहे. ठाण्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी हेमंत वाणी यांच्या होळी उत्सवाला जितेंद्र आव्हाड यांनी भेट दिली. यावेळी होळीचे दहन करताना त्यांनी 50 खोक्यांची कंपनी असा उल्लेख करत जोरदार घोषणाबाजी यावेळी केली.

Back to top button