ठाणे : डोंबिवलीत आढळला आफ्रिकेतील दुर्मिळ रणगोजा | पुढारी

ठाणे : डोंबिवलीत आढळला आफ्रिकेतील दुर्मिळ रणगोजा

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा :  कल्याणच्या रिंगरोड परिसरात दुर्मिळ प्राच्य शिंगाळा घुबड आढळले असतानाच आता डोंबिवलीच्या भोपर गावात दक्षिण आफ्रिकेतील दुर्मिळ रणगोजा (Desert Wheatear) अर्थात रणगप्पीदास आढळून आला आहे. पक्षी निरीक्षक तथा आहारतज्ञ डॉ. महेश पाटील यांना या देखण्या पक्षाला त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात यश आले आहे.

युरोप खंडात वास्तव्यास असणारे विविध प्रजातींचे पक्षी सद्या स्थलांतर करून डोंबिवलीत दाखल झाले आहेत. यामध्ये दुर्मीळ पक्ष्यांचाही समावेश आहे. मागील काही दिवसांपासून डोंबिवली येथील काही ठिकाणी परदेशी पक्षी आढळून येत आहेत. या स्थलांतरित पक्ष्यांचे छायाचित्र टिपण्यासाठी अनेक पक्षिप्रेमी आणि छायाचित्रकार या ठिकाणांना भेट देत आहेत. नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात दाखल होणारे हे सर्व पक्षी मार्चच्या सुरुवातीला परतीच्या प्रवासाला निघतात. डॉ. महेश पाटील हे नेहमीप्रमाणे भोपर गावाच्या शिवारात फेरफटका मारत होते. इतक्यात हा दुर्मिळ रणगोजा तथा रणगप्पीदास त्यांच्या निदर्शनास आला. अतिशय चपळ असलेल्या या रणगोजाचे दक्षिण आफ्रिकेचे (south africa) सुप्रसिद्ध सहारा वाळवंट (sahara Desert ) मूळ निवासस्थान आहे. या  ठिकाणाहून हा रणगोजा तब्बल ५ हजार किलोमीटर अंतर कापून डोंबिवलीमध्ये दाखल झाला आहे. विशेष म्हणजे त्याचा आकार आणि रंग हा आपल्याकडील चिमणीप्रमाणेच आहे. दरवर्षी हिवाळ्याच्या दिवसांत हा चिमुकला मात्र तितकाच कणखर असलेला रणगोजा हजारो किलोमीटर अंतर कापून भारतात दाखल झाल्याची माहिती पक्षी निरीक्षक डॉ. महेश पाटील यांनी दिली.

  • रणगोजा हा आकाराने चिमणी एवढा असतो. साधारणतः पिवळट पांढऱ्या रंगाच्या नराचा कंठ व डोक्याखालील भागाचा रंग काळा, भुवई पिवळट तर शेवटीचा रंग काळपट  असतो. हा पक्षी दिसायला फारच सुंदर दिसतो. मराठीत रणगोजासह रणगप्पीदास असेही त्याला म्हटले जाते. या पक्ष्याची वीण बलुचीस्तान भागात, तर त्याची हिवाळातील व्याप्ती राजस्थान, गुजरातसह महाराष्ट्रापर्यंत असते.

उंबाली परिसरात १३४ प्रजातींचे पक्षी

येऊरचे जंगल, डोंबिवली जवळची उंबार्ली टेकडी, मलंगगड परिसर, तसेच ठाणे आणि वाशी येथील विस्तृत खाडी परिसरात विविध वनस्पती, दुर्मीळ पक्षी आणि प्राण्यांचा वावर असतो. पर्यावरण अभ्यासकांच्या मते डोंबिवली जवळच्या उंबार्ली टेकडी परिसरात जवळपास १३४ प्रजातींचे विविध पक्षी आढळून येतात. यामध्ये स्थानिक पक्ष्यांचा समावेश अधिक आहे.

डोंबिवलीत २२ प्रजातींचे परदेशी पाहुणे

सद्या डोंबिवली आणि आसपासच्या परिसरांत परदेशातल्या २२ प्रजातींचे परदेशी पक्षी आढळून येत आहेत. मागील काही वर्षांपासून डोंबिवली आणि आसपासच्या परिसरांत स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण वाढले आहे. यापैकी काही पक्षी ठाणे आणि वाशी खाडी पट्ट्यातील वातावरण अनुकूल असल्याने ते या भागात स्थायिक होतात.

Back to top button