निर्दयी पित्याने केली बारावर्षीय मुलाची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकला | पुढारी

निर्दयी पित्याने केली बारावर्षीय मुलाची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकला

अंबरनाथ; पुढारी वृत्तसेवा :  निर्दयी पित्याने आपल्या बारा वर्षीय मुलाचीच गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे हत्या करून मुलाचा मृतदेह नाल्यात फेकून परतताना काही जागरूक नागरिकांनी या निर्दयी पित्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आनंद गणेशन असे या निर्दयी पित्याचे नाव असून हत्या केलेल्या मुलाचे नाव आकाश असे आहे.

अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागातील कल्याण, बदलापूर मार्गावरील शास्त्री नगर परिसरात आनंद गणेशन राहतो. कौटुंबिक वादामुळे आनंद हा त्याची पत्नी आणि दोन मुलांपासून गेल्या काही वर्षांपासून वेगळा राहतो. मात्र आपल्या मुलांना भेटण्यासाठी तो घरी येत असे. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे आनंद घरी आला व त्याने १२ वर्षीय मुलगा आकाश याला आपल्या दुसऱ्या घरी घेऊन आला. मात्र त्यानंतर आनंद याने आपल्या बारा वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्दयपणे हत्या केली. या हत्येनंतर आनंदने आपल्या मुलाचा मृतदेह एका गोणीत भरून रात्री पावणे बाराच्या सुमारास अंबरनाथ पश्चिमेतील पोलीस स्टेशन समोरूनच रेल्वे रुळाला लागून असलेल्या नाल्यात फेकण्यासाठी नेला.
यावेळी आनंद याच्या खांद्यावर असलेली मृतदेहाची गोणी पाहून काही पादचाऱ्यांना संशय आला. त्यामुळे मृतदेह नाल्यात फेकल्यानंतर माघारी निघालेल्या आनंदला काही जागरूक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

गोणीत आढळला मृतदेह

पोलिसांनी तात्काळ आनंद याने नाल्यात फेकलेल्या गोणीची घटनास्थळी पाहणी केली तर गोणीत एका बारा वर्षीय मुलाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. तपास केल्यानंतर पोलिसांनी आनंद याच्या पत्नीला याबाबत माहिती दिली. तसेच आकाश याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी आनंद याला अटक करण्य आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली आहे.

 

Back to top button