35  टक्के घटस्फोट सोशल मीडियामुळे! | पुढारी

35  टक्के घटस्फोट सोशल मीडियामुळे!

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  लग्नात मानपान किंवा हुंडा दिला नाही, स्वयंपाक येत नाही, सासू-सासरे छळ करतात, अशा स्वरूपाची कारणे यापूर्वी पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत होती. मात्र, आता यात सोशल मीडियाशी संबंधित कारणेही वाढू लागली आहेत. विधी सेवा प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात राज्यात 25 हजारांहून अधिक घटस्फोटासाठी अर्ज करण्यात आले आहेत. त्यापैकी 35 टक्के प्रकरणांत घटस्फोटासाठी मोबाईल अथवा सोशल मीडियाचे कारण पुढे करण्यात आले आहे.

एकट्या मुंबईत 2022 या वर्षभरात 12 हजार तर ठाण्यात 5 हजाराहून अधिक अर्ज घटस्फोटासाठी दाखल करण्यात आले आहेत. .
सोशल मीडियाच्या आहारी गेल्यामुळे पती-पत्नीच्या नात्यांत दुरावा निर्माण झाल्याच्या अनेक घटना विधी सेवा प्राधिकरणासमोर आल्या आहेत. घटस्फोट घ्यावा या मतापर्यंत पोहोचलेल्या दाम्पत्यांचे समुपदेशन करून त्यांची मने जुळवण्याचे काम या प्राधिकरणामार्फत केले जाते. गेल्या वर्षभरात प्राधिकरणाकडे आलेल्या एकूण संख्येच्या अर्जापैकी अनेक दाम्पत्यांचे यशस्वी समुपदेशन झाल्याने ते सुखाने नांदत आहेत. 50 टक्के प्रकरणात परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे.

वास्तवातल्या नातेसंबंधांचा व मैत्रीचा जिव्हाळा आजच्या आधुनिक युगात हळूहळू कमी होऊ लागला असून त्याची जागा सोशल मीडियाचे आभासी जग घेऊ लागले आहे. हल्ली बहुतांश लोक या आभासी दुनियेत तासन्तास मश्गुल असतात. साहजिक त्यामुळे वास्तविक नाती दुरावू लागली आहेत.

मुंबई, पुणेनंतर नंबर नागपूरचा…

सोशल मीडियामुळे सुखी संसारात विघ्न पडण्याची व घटस्फोटासाठी अर्ज करणार्‍यांची संख्या सातत्याने वाढत असून, यात मुंबई आणि पुण्याच्या पाठोपाठ नागपूरचा तिसरा क्रमांक आहे. गेल्या वर्षभरात प्राप्त झालेल्या एकूण तक्रारींपैकी जवळपास 35 टक्के तक्रारींमध्ये मोबाईलचा अतिवापरामुळे पत्नी अथवा कुटुंबीयांकडे दुर्लक्ष या स्वरूपाची कारणे आहेत, असे विधी सेवा प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले.

Back to top button