ठाणे : कल्याणमध्ये पदोन्नती रोखल्याचा रागातून हवालदाराकडून सब इन्स्पेक्टरची हत्या

file photo
file photo

डोंबिवली;  पुढारी वृत्तसेवा :  कल्याण पूर्वेकडे असलेल्या सिध्दार्थनगरमधील रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचारी निवास वसाहतीमध्ये बुधवारी रात्री रक्तरंजित पण धक्कादायक घटना घडली. कानांत कॉड टाकून गाणी ऐकत बेडवर बसलेल्या रेल्वे सुरक्षा बलातील एका बेसावध उपनिरीक्षकाची त्याच विभागातील एका हवालदाराने लाकडी दांडक्याचे प्रहार करून जागीच खात्मा केला. चौकशीत दोषी आढळल्यानंतर केलेल्या कारवाईदरम्यान पदोन्नतीसह वेतनवाढ रोखल्याच्या वादातून या माथेफिरू हवालदाराच्या हातून खुनाचे कृत्य घडले असल्याचा कयास असून पोलिस त्याही दिशेने तपास करत आहेत. हत्या करून पसार झालेल्या या माथेफिरू खुन्याला कोळसेवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांतच अटक केली आहे.

बसवराज गर्ग (५६) असे हत्या झालेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. मृत गर्ग हे रेल्वे सुरक्षा बलाच्या अंबरनाथ रेल्वे स्थानक विभागात कार्यरत होते. तर पंकज यादव (३५) असे हल्लेखोर खून्याचे नाव आहे. अटक करून या खुन्याला कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने अधिक चौकशीसाठी त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हा खूनी रेल्वे सुरक्षा बलाच्या रोहा विभागात कार्यरत आहे. कोळसेवाडी पोलिसांनी त्याला रात्रीच अटक केली आहे.

अधिकारी बसवराज गर्ग बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या कल्याण पूर्वेकडे असलेल्या रेल्वे निवासातल्या खोलीत बिछान्यावर पडून कानांना कॉड लावून मोबाईलमधील गाणी ऐकत आराम करत होते. त्यांचा सहकारी उपनिरीक्षक राकेशकुमार त्रिपाठी हे खोलीच्या बाहेर जाऊन धुतलेले कपडे दोरीवर वाळत घालत होते. अचानक खोलीतून ओरडण्याचा आवाज आल्याने वाळत घालण्याचे कपडे तिथेच टाकून उपनिरीक्षक त्रिपाठी यांनी खोलीकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांना उपनिरीक्षक बसवराज गर्ग हे पलंगावरुन खाली पडल्याचे दिसले. एक इसम पलंगाला मच्छरदाणीसाठी लावलेली लोखंडी सळई काढत होता. काय झाले म्हणून त्रिपाठी यांनी त्या अनोळखी इसमाला विचारताच त्याने तू मध्ये पडू नकोस, असा दम दिला. पलंगाच्या बाजुला उशी, चादर, लाकडी दांडके पडले होते.
हा प्रकार पाहताच उपनिरीक्षक त्रिपाठी यांनी खोली बाहेर येऊन आपल्या सहकाऱ्यांना ओरडून आवाज दिला. त्यावेळी एस. एस. शेटे, संतोष पटेल, मंगेश उमाशंकर कुर्मी हे तेथे धावत आले. तोपर्यंत त्या अनोळखी आडदांड इसमाने तेथून पळ काढला होता. अलीकडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बसवराज गर्ग यांना उचलून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. गर्ग यांच्या मारेकऱ्याला पळून जाताना इतर सहकाऱ्यांनी पाहिले. उपनिरीक्षक त्रिपाठी यांनी पळून गेलेला इसम कोण होता ? अशी विचारणा सहकाऱ्यांना केली. त्यांनी तो रेल्वे सुरक्षा बलातील हवालदार पंकज यादव असल्याचे सांगितले.

वेतनवाढीसह पदोन्नती रोखल्याचा राग

दोन वर्षांपूर्वी रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात हवा. पंकज याचे त्याच्या सहकाऱ्याशी वाद झाले होते. सहकाऱ्याने या संदर्भात वरिष्ठांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या चौकशीनंतर समितीतील अधिकाऱ्यांनी हवा. पंकज यादव याच्यावर कारवाई केली. त्याची इन्क्रिमेंट अर्थात वेतनवाढीसह पदोन्नती थांबवली. या कारवाईचा राग पंकजच्या मनात सतत खदखडत होता. दोन वर्षांपासून तो संधीच्या शोधात होता. अखेर बुधवारी रात्री गाढून बेसावध असताना बसवराज यांची हत्या केल्याचे उघड झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news