दिल्लीच्या भामट्यांचा फसवणुकीसाठी नवा फंडा; सिमकार्डद्वारे सोने, मोबाईल खरेदी-विक्री करणारे गजाआड | पुढारी

दिल्लीच्या भामट्यांचा फसवणुकीसाठी नवा फंडा; सिमकार्डद्वारे सोने, मोबाईल खरेदी-विक्री करणारे गजाआड

ठाणे : संतोष बिचकुले : ज्वेलर्स, मोबाईल दुकानदारांची फसवणूक करण्यासाठी नवीन फंडा वापरणाऱ्या दिल्लीच्या भामट्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही कारवाई मुंबई पोलीस दलाच्या अंबोली पोलिसांनी केली. हे आरोपी बोगस कागदपत्रांद्वारे सिमकार्ड खरेदी करून त्याद्वारे फसवणूक करत होते. या आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दै. ‘पुढारी’ला दिली.

वारंवार होणारे ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे रोखण्यासाठी मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. परिणामी, भामट्यांचे फसवणुकीचे फंडे फोल ठरू लागले. त्यामुळे भामट्यांनी आता नवा फंडा वापरण्यास सुरुवात केली. हे भामटे बोगस कागदपत्रांद्वारे सिमकार्ड विकत घेत. त्या सिमकार्डाद्वारे बोगस बँकांचे डिटेल देऊन ईएमआयवर ऑनलाईन मोबाईल, सोन्याचे दागिने विकत घेत. सदर मुद्देमाल ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या नामांकित वेबसाईटवर प्रसिद्ध करत. मुद्देमालाची विक्री होताच तात्काळ ईएमआय भरणे बंद करायचे. ईएमआय बंद झाल्याने संबंधित कंपन्या, दुकानदार खरेदीसाठी वापरलेल्या मोबाईल नंबरवर फोन करत. मात्र, मोबाईल बंद असायचे. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. वारंवार घडणाऱ्या या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आरोपींना तुरुंगात धाडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, सर्वच पोलीस ठाण्यांचे अधिकारी, अंमलदार, भामट्यांवर लक्ष ठेवू लागले.

आरोपींच्या अटकेसाठी विशेष शोधमोहीम सुरू असताना अंबोली पोलिसांना बोगस कागदपत्रांद्वारे सिमकार्ड विकत घेणाऱ्यांची माहिती खबऱ्याने दिली. त्या माहितीच्या आधारे उपायुक्त अनिल पारसकर, एसीपी सूर्यकांत बागर, वपोनि बंडोपंत बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीनिवास चेवले, संतोष माने, सपोउपनि खान, अंमलदार धनेश, आचार्य, कामठे यांनी सोमवारी रात्री उशिरा अंधेरीतील अंबोलीनाका येथे सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे बोगस कागदपत्रे आढळली. तसेच दोन साथीदार हॉटेलमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी हॉटेलमधून आणखी दोघांच्या मुसक्या आवळल्या. या आरोपींच्या अटकेमुळे अनेक गुन्हे उघडकीस येणार असल्याने अंबोली पोलिसांनी चारही आरोपींची नावे गुपित ठेवली आहेत.

Back to top button