ठाणे : भिवंडीत चिमुरडीवर अत्याचार करून हत्या | पुढारी

ठाणे : भिवंडीत चिमुरडीवर अत्याचार करून हत्या

भिवंडी; पुढारी वृत्तसेवा :  भिवंडीत एका विकृत नराधमाने तीन वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत हत्या केल्याची घटना शहरालगतच्या काटई या गावात उघडकीस आली असून या घटनेनंतर पाच तासात नराधमास त्याच्या खोलीतून ताब्यात घेत मुसक्या आवळण्यात निजामपुरा पोलिसांनी यश मिळविले आहे. भीमकुमार शिवकुमार मंडल (२६ मूळ रा. मधुबनी बिहार ) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काटई गावातील एका चाळीत पीडित चिमुरडी आपल्या आई – वडिलांसह राहत असताना रविवारी सायंकाळी चिमुरडी चाळीबाहेर खेळत असताना सहा वाजताच्या सुमारास चिमुरडी आढळून न आल्याने आईने परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर ती न सापडल्याने निजामपुरा पोलीस ठाण् आईने धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस निरीक्षक दीप बने व पो उपनिरी सचिन कुंभार, आशिष पवार, धोंगडा व पोलीस कर्मचार शिरसाठ, सोनवणे, कोळी, सांबरे, शिंदे, बनसोडे या पथकाने सहा पथक बनवून घटनास्थळापासून सुमारे पाच किलोमीटरचा परिसर पिंजून काढला.

परंतु हाती निराशा आल्याने रात्री बारा वाजताच्या सुमारास पोलीस पथकाने पुन्हा घटनास्थळापासून शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी पीडितेच्या खोलीपासून चार खोल्या सोडून असलेल्या खोलीचा दरवाजा बंद होता पण आतून अंधुक प्रकाश दिसत असल्याने पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी खोली उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु आतून खोली उघडली जात नसल्याने एका युवकाने दुसऱ्या बाजूने छतावर चढून कौल काढण्यास सुरवात केल्यावर जबरदस्ती करून दरवाजा उघडण्यात आला. त्या ठिकाणी दरवाजाच्या पाठीमागे चिमुरडी निपचित पडली होती. तर नराधम तेथेच आढळून आला. पोलीस पथकाने तातडीने चिमुरडीस आयजीएम रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी नराधम भीमकुमार शिवकुमार मंडल यास ताब्यात घेत त्याविरोधात अपहरण, बलात्कार पोस्को सह हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकस तपासाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या पोलिसांनी सुरवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल केला त्यादृष्टीने तपास करीत असताना पोलीस पथकाने संपूर्ण परिसर अंधारात पिंजून काढत असताना निर्जनस्थळ, बंद यंत्रमाग कारखाने, रस्त्यात उभी असलेली वाहने या ठिकाणी शोध घेतला परंतु चाणाक्ष पोलिसांच्या नजरेने आरोपीचा शोध पाच तासात घेतला. जर आरोपीस अजून काही तासांचा अवधी मिळाला असता तर त्याने या शहरातून पलायन केले असते तर त्याला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आले असते. या विरोधात अधिकाधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी दिली आहे.

Back to top button