डोंबिवली एमआयडीसी : वारंवार होणाऱ्या स्फोटांमुळे परिसरात भीती; प्रदुषणात वाढ | पुढारी

डोंबिवली एमआयडीसी : वारंवार होणाऱ्या स्फोटांमुळे परिसरात भीती; प्रदुषणात वाढ

डोंबिवली; बजरंग वाळुंज :  साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक नगरी अशी बिरुदावली लावलेल्या डोंबिवलीला प्रोबेस दुर्घटनेनंतर आता स्फोटांचे शहर म्हणूनही ओळखले जात आहे. शहरातील एमआयडीसी भाग आणि त्यातील स्फोटांमुळे सातत्याने हादरणारी डोंबिवली हे चित्र गेल्या वर्षापासून सातत्याने दिसत आहे. एकीकडे कल्याण- डोंबिवलीतील हवेची गुणवत्ता मोठ्याप्रमाणात घसरल्याचे हवा गुणवत्ता निर्देशांकावरून दिसून येत आहे. तर दुसरीकडे डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात नेहमीच्या प्रदूषणामुळे या भागातील रहिवाशांना निरनिराळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे.

अशा या डोंबिवली एमआयडीसीचे स्वतःचे वेगळे अग्निशमन केंद्र आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय हवे. त्यांच्याकडे प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी हवेत. ज्यांच्याकडे हद्दीतील प्रत्येक रासायनिक कारखान्याची इतंभूत माहिती व उपायांची नोंद असणे गरचेचे आहे. तर याच औद्योगिक दोन्ही भागांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या निवासी विभागातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या नागरी समस्या कितीही कमी करण्याचा प्रयत्न केला तरी त्या दूर होताना दिसत नाहीत.

धूर ओकणाऱ्या कंपन्या, उघडे नाले, एमआयडीसीच्या राखीव जागेत असलेले विविध उत्पादन घेणारे कारखाने, केमिकल कंपन्या यांचे वास्तव्य हा प्रत्येक शहराचा एक भाग असतो. मात्र या भाग शहरापासून काहीसा दूर असावा. तेथे रहिवाशांची संख्या नसावी या आणि अशा अनेक नियमांची चौकट असते. मात्र, यातील कोणताही नियम डोंबिवली एमआयडीसीला लागू नाही. एमआयडीसी परिसरात धूर ओकणाऱ्या कंपन्या, उघडे नाले, त्यातून पसरलेली अफाट दुर्गंधी हेच चित्र एमआयडीसी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून दिसून येते. रस्त्यांची झालेली चाळण, अनेक वर्षांपासून त्याकडे केले गेलेले दुर्लक्ष यांमुळे अनेक वर्ष नागरिक त्रस्त होते. मात्र प्रोबेसच्या स्फोटानंतर मनःस्तापाची जागा भीतीने घेतली आहे.

एमआयडीसी परिसराबाबत नागरिकांना अगणित समस्या भेडसावत आहेत. प्रोबेस या विविध कंपनीत झालेल्या शक्तिशाली स्फोटाने संपूर्ण शहरच थरारले. यापूर्वीही काही प्रमाणात एमआयडीसीमध्ये अशा स्वरूपाच्या घटना घडल्या असल्या तरी प्रोबेसची तीव्रता सर्वाधिक होती. मात्र ही संकटाची नांदी ठरली असून त्यानंतरही ही स्फोटांची मालिका सुरूच राहिली. कमी अधिक प्रमाणात हे स्फोट धोकादायक असल्याचे दिसत असले तरी या हादऱ्यांमुळे डोंबिवलीतील एमआयडीसी परिसर या सातत्याने भीतीच्या छायेत असतो.

एमआयडीसी परिसर आणि तेथील सुरक्षा डोंबिवली एमआयडीसी भागातील कारखान्यांची बंदी हरित लवादाद्वारे उठवण्यात आल्यानंतरही सुरक्षेच्या प्रश्नावर मौन कायम आहे. त्यामुळे कारखान्याच्या प्रश्नाकडे आता तरी निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सामान्यांनी मागणी केली आहे.

Back to top button