येत्या अधिवेशनात शक्ती कायदा येईल : मंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

येत्या अधिवेशनात शक्ती कायदा येईल : मंत्री एकनाथ शिंदे

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला शक्ती कायदा हा येत्या अधिवेशनात पारित होईल, असा विश्वास राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

डोंबिवलीतील दुर्दैवी घटनेनंतर महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पोलीस हद्दीचा प्रश्न उपस्थित न करता महिला, मुलींच्या तक्रारांची तातडीने शहानिशा करून कारवाई करावी, तसेच शहरांमधील सर्व बंद पडलेले कारखाने, रिकाम्या इमारती, निर्जन स्थळे आदी ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग करण्याच्या सूचना सर्व पोलीस अधिकार्‍यांना दिल्या आहेत, असे ना. शिंदे यांनी सांगितले.

डोंबिवलीसारखी दुर्घटना भविष्यात होऊ नये म्हणून बोलवलेल्या पोलीस अधिकार्‍यांच्या बैठकीत आढावा घेतल्यानंतर ना. शिंदे पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त जय जीत सिंग, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आदी अधिकारी उपस्थित होते. सक्षम असा शक्ती कायदा करण्यासाठी काही काळ माझ्याकडे गृह खाते होते, तेव्हापासून अभ्यास करण्यात आला. हा कायदा अधिक सक्षम होण्यासाठी आता संयुक्त समितीकडे गेलेला आहे. येत्या अधिवेशनात सर्वांगीण असा शक्ती कायदा मंजूर होईल, असा विश्वास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

पोलीस ठाण्याच्या हद्दीचा वाद न घालता संबंधित महिला, मुलींच्या तक्रारी तातडीने घेऊन शहानिशा करून कारवाई करावी. त्यानंतर ते प्रकरण संबंधित पोलीस ठाण्याकडे द्यावे, त्यामुळे महिला अत्याचारांची संधी मिळणार नाही. शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करीत पोलिसांना वाहनेही उपलब्ध करून दिली जातील, असे आश्‍वासनही शिंदे यांनी दिले.

Back to top button