ठाण्यात मराठा मुलींच्या वसतिगृहात प्रवेश सुरू : दै. पुढारीच्या पाठपुराव्याला यश | पुढारी

ठाण्यात मराठा मुलींच्या वसतिगृहात प्रवेश सुरू : दै. पुढारीच्या पाठपुराव्याला यश

ठाणे, दिलीप शिंदे : महाराष्ट्रातून ठाणे, मुंबई परिसरात शिक्षणासाठी येणाऱ्या मराठा मुलींना राहण्याची उत्तम सोय व्हावी, याकरिता ठाण्यात पहिले मुलींसाठी वसतिगृह सुरू झाले आहे. राज्य शासन आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठा आरक्षण, कोपरी बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशी आणि मागण्यांसाठी राज्यात विक्रमी ५८ मोर्चे निघाले आणि मराठा समाजाने आपला शांततेच्या मार्गाने संताप व्यक्त केला होता. त्यानंतर सरकारने जिल्हानिहाय मराठा मुला मुलींसाठी वसतिगृहाची घोषणा केली. मात्र पुढे काही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे  २०१७ पासून ठाण्यात वसतीगृह सुरू करण्यासाठी दैनिक पुढारीने बातम्यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू ठेवला.

मात्र, हे वसतिगृहात फक्त आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजातील मुला-मुलींना प्रवेश मिळण्यासाठी अडचणी येत होत्या.  याकरिता जीआरमध्ये असलेल्या त्रुटी आणि सुधारणा करण्याची बाब मराठा आरक्षण समितीचे सदस्य तथा पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनात आणून देण्यात आले.  अखेर ठाण्यातील कापूरबावडी येथील ठाणे महापालिकेच्या इमारतीचे हस्तातरण व उद्धाटन पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते आणि महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी शिंदे यांनी हे वसतिगृह फक्त मराठा समजासाठीच असेल, अशी भूमिका स्पष्ट केली.

मात्र, वसतिगृह सुरू करण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी आणि संस्थांचा अल्प प्रतिसाद हा वसतिगृह प्रत्यक्षात सुरू करण्यास अडचण ठरत होता. त्याचे प्रमुख कारण हे सरकारकडून प्रत्येक मुली मागे मिळणारे तुटपुंजे अनुदान होय. परिणामी वसतिगृह चालविण्यास कुणी संस्था पुढाकार घेत नव्हते. अखेर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयचे प्राचार्य हे सचिव असलेल्या समितीने वारंवार निविदा प्रसिद्ध करीत संस्थांना आवाहन केले. अखेर नवीन मुंबईतील समता विकास प्रतिष्ठान यांनी ठाण्यातील पहिले डॉ. पंजाबराव देशमुख मुलींचे वसतिगृह चालविण्यास घेतले. हस्तांतरण झाले आणि ३५ मुलींची राहण्याचा मार्ग मोकळा झाला. हे वसतिगृहसाठी प्रवेश सुरू झाल्याने मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाने सरकारचे प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले. या संधीचा अधिकाधिक फायदा घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button