डोंबिवली : सात वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; आईची सुरक्षा रक्षकासोबतची मैत्री मुलाच्या जीवावर बेतली | पुढारी

डोंबिवली : सात वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; आईची सुरक्षा रक्षकासोबतची मैत्री मुलाच्या जीवावर बेतली

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : इमारतीच्या सुरक्षा रक्षकासोबत केलेली मैत्री एका महिलेच्या मुलाच्या जीवावर बेतली आहे. सुरक्षा रक्षकाने सात वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली असून खडकपाडा पोलिसांनी सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे.

नितीन कांबळे असे या आरोपीचे नाव असून, तो खडकपाडा परिसरातील इमारतीत एका विंगचे सुरक्षा रक्षकाचे काम करत होता. तर कविता भोसले ही तिचा सात वर्षीय मुलगा प्रणव भोसले यांच्या समवेत याच इमारतीच्या दुसऱ्या विंगमध्ये राहत होती. रोजचा संपर्क येत असल्याने त्यांच्यात मैत्री पूर्वक संबंध होते. मात्र नितीन आणि कविता यांच्यात काही कारणास्तव वाद होण्यास सुरुवात झाली. याचाच राग मनात धरून सोमवारी दुपारी नितीन याने प्रणवची हत्या केली.

आरोपी नितीन हा प्रणवला घरी घेऊन जाण्यासाठी शाळेत गेलेला होता. मात्र प्रणवला घरी घेऊन न जाता थेट गौरीपाडा परिसरातील सुंदर रेसिडेन्सी गाठले. या रेसिडेन्सीच्या गाच्चीवरील पाण्याच्या टाकीत त्याने प्रणवला ढकलून दिले. त्यानंतर स्वतःवर कोणताही संशय येऊ नये म्हणून नितीनने कविताने माझे 50 हजार रुपये घेतले आहेत. ते दिले नसल्याने मी आत्महत्या करत असल्याचा संदेश फेसबुकवर लिहिला. इतकेच नव्हे तर त्याने खडकपाडा पोलीस ठाणे गाठत महिलेने पैसे बुडविल्याने मी विषारी गोळ्या खल्ल्याचा कांगावा देखील केला.

दरम्यान मुलगा अद्यापही शाळेतून घरी आला नसल्याने कविताने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याचवेळी पोलीस ठाण्यात बसलेल्या नितीनवर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी नितीनला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केल्यानंतर आपणच ही हत्या केल्याचे त्याने कबूल केले. यांनतर पोलिसांनी तत्काळ धाव घेत मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. ही हत्या का केली यामागची अधिक चौकशी करत पोलीस करत आहेत.

हेही वाचा

Back to top button