Stock Market Crash Today | एक दिवसाच्या ब्रेकनंतर सेन्सेक्स पुन्हा लाल रंगात! जाणून घ्या आज काय घडलं बाजारात?

Stock Market Crash Today | एक दिवसाच्या ब्रेकनंतर सेन्सेक्स पुन्हा लाल रंगात! जाणून घ्या आज काय घडलं बाजारात?

Stock Market Crash Today : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांच्या व्याजदरवाढीच्या घोषणेपूर्वी आणि महागाईचा डेटा रिलीज होण्याआधी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांकडून विक्रीचा जोर वाढल्याने भारतीय शेअर बाजारात मंगळवारी (दि.१०) घसरण झाली. सोमवारच्या सत्रात सेन्सेक्स, निफ्टीने प्रत्येकी १ टक्क्याहून वाढ नोंदवली होती. त्यानंतर आज मंगळवारी शेअर बाजारातील तेजी थांबली. कालच्या ८४६ अंकांच्या वाढीसह ६०,७४७ वर बंद झालेला सेन्सेक्स मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे ३५० हून अधिक अंकांनी खाली आला होता. तर निफ्टी १८ हजारांवर होता. त्यानंतर सेन्सेक्स ६३१ अंकांच्या घसरणीसह ६०,११५ वर बंद झाला. तर निफ्टी १८७ अंकांच्या घसरणीसह १७,९१४ वर स्थिरावला.

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (FII) संभाव्य विक्रीचा दबाव राहिल्याने मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजाराने सोमवारच्या सत्रात मिळवलेला बहुतांश नफा गमावला. आजच्या घसरणीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांना ३ लाख कोटींचा फटका बसला. यामुळे BSE सूचीबद्ध सर्व स्टॉक्सचे एकूण बाजार भांडवल २८० लाख कोटींवर आले. ऑटो वगळता सर्व क्षेत्रांमध्ये आज विक्रीचा मारा दिसून आला. या आठवड्यात तिसर्‍या तिमाहीतील उलाढालीचे आकडे जाहीर होत असल्यामुळे बँका आणि आयटी शेअर्संमध्ये घसरण दिसून येत आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे शेअर्स २.५ टक्क्याने घसरले. निफ्टी ५० इंडेक्समध्ये टीसीएस टॉप लूजर होता. दरम्यान, ऑटोमोबाईल स्टॉक्स ०.८ टक्क्याने वाढल्याने काही प्रमाणात तोटा कमी होण्यास मदत झाली. सेन्सेक्सवर टीसीएस, इन्फोसिस हे सर्वाधिक घसरले. हे शेअर्स १.५ टक्के ते २ टक्क्यांपर्यंत खाली आले. एशियन पेंट्स, एचडीएफसी, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक, इंडसइंड बँक यांचे शेअर्सदेखील घसरले. दरम्यान, टाटाम मोटर्स, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, एम अँड एम, सन फार्मा यांचे शेअर्स तेजीत होते.

क्षेत्रिय निर्देशांकात निफ्टी आयटी १.२७ टक्के आणि निफ्टी पीएसयू बँक ०.४४ टक्क्यांनी घसरला. तर निफ्टी ऑटो आणि निफ्टी मेटल वधारले. निफ्टी मिडकॅप ५० हा ०.१५ टक्क्याने घसरला आणि स्मॉलकॅप ५० हा स्थिर पातळीवर होता.

TCS ला फटका

भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS च्या उलाढालीचे डिसेंबर तिमाहीचे आकडे गुंतवणूकदारांना प्रभावित करण्यात अयशस्वी ठरले. यामुळे या हेविवेट आयटी कंपनीच्या शेअर्सनी २.५ टक्के घसरून ३,२३७.०५ रुपयांवर व्यवहार केला. TCS च्या महसुलात तिसर्‍या तिमाहीत १९.१ टक्के वाढ (५८,२२९ कोटी) झाली असून कंपनीच्या उलाढालीने विश्लेषकांच्या अंदाजांना मागे टाकले आहे.

अमेरिकेत घसरण, आशियाई बाजारात संमिश्र वातावरण

अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक घसरून बंद झाले. एस अँड पी ५०० निर्देशांक ०.१ टक्के खाली येऊन बंद झाला. तर डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ०.३ टक्क्याने घसरला. तर आशियाई बाजारातही संमिश्र वातावरण होते. मजबूत टेक्नॉलॉजी स्टॉकच्या जोरावर मंगळवारी जपानचा निक्केई निर्देशांक दोन आठवड्यांच्या उच्च पातळीवर बंद झाला. निक्केई सरासरी ०.७८ टक्के वाढून २६,१७५ वर बंद झाला. या निर्देशांकांची २८ डिसेंबरनंतरची ही उच्चांकी पातळी आहे. तर टॉपिक्स ०.२७ टक्के वाढून १,८८०.८८ वर पोहोचला. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा निर्देशांक ०.०२ टक्क्याने खाली आला होता. दरम्यान, युरोपीय शेअर्स घसरले आहेत.

फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाकडे लक्ष

गुंतवणूकदारांचे फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढीची गती कमी करेल अशी गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. (Stock Market Crash Today)

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा

NSE वरील आकडेवारीनुसार, सोमवारी (दि.९) परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) २०३.१३ कोटी रुपयांचे शेअर्स विकले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) १,७२३.७९ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. (Share Market Today)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news