ठाण्यात ४,२९४ धोकादायक इमारती

ठाण्यात ४,२९४ धोकादायक इमारती

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींची यादी ठाणे महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आली असून यामध्ये तब्बल ४,२९७ इमारती या धोकादायक असल्याचे माहिती उघड झाली आहे. यापैकी ८७ इमारती या अतिधोकादायक श्रेणीत येत असून या असुरक्षित निवाऱ्यात नागरिक अक्षरशः आपला जीव मुठीत घेऊन राहत असल्याचे वास्तव समोर आले आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने दरवर्षीच अशा इमारती खाली करून या इमारती निष्कासित करण्याची कारवाई केली जात असली तरी हक्काचा निवारा सोडून नागरिक जायला तयार नसल्याने धोकादायक इमारतींचे दृष्टचक्र गेल्या अनेक वर्षांपासून सुटलेले नाही.

ठाणे शहर, वागळे इस्टेट, कळवा आणि मुंब्रा भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा इमारती आहेत. तसेच नौपाडा परिसरातील अधिकृत इमारती मोडकळीस आल्या आहेत. अशा इमारती पावसाळ्यात कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. यापुर्वी अशा घटना घडल्या असून त्यात नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येते. सी-१, सी- २ए , सी२बी आणि सी ३ अशा चार टप्प्यांत धोकादायक इमारतींचे वर्गीकरण करण्यात येते. यंदाही पालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी शहरातील इमारतींचे नुकतेच सर्वेक्षण केले आहे. यामध्ये संपूर्ण शहरात ४ हजार २९७ इमारती धोकादायक असल्याची बाब पुढे आली आहे.

यात सी-१ मध्ये अतिधोकादायक इमारतींचा समावेश असतो. या इमारतीमधील रहिवाशांचे इतरत्र पुनर्वसन करून त्या इमारतींचे बांधकाम पाडण्यात येते. यंदाही महापालिका प्रशासनाने अशाप्रकारे शहरातील ८६ अतिधोकादायक इमारतींचे बांधकाम पाडण्याचे काम सुरू केले असून त्यापैकी २२ इमारतींचे बांधकाम पाडले आहे. उर्वरित ६६ इमारतींमधील रहिवाशांना सदनिका रिकाम्या करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून जशा इमारती रिकाम्या होत आहेत, तशा त्यांचे बांधकाम तोडण्यात येत आहे.

पालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचे सी-१, सी-२ ए, सी- २बी आणि सी-३ अशा चार टप्प्यांत वर्गीकरण केले आहे. सी-१ म्हणजे राहण्यास अयोग्य आणि तात्काळ निष्कासित करावी लागणारी अतिधोकादायक इमारत, सी- २ ए म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे, सी- २ बी म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करणे आणि सी-३ म्हणजे इमारतींची किरकोळ दुरुस्ती करणे. त्यामुळे सी-२ बी आणि सी-३ च्या यादीत ४ हजार १९ धोकादायक इमारती असल्या तरी त्याठिकाणी रहिवास सुरूच आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news