

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे शहरात मुंबई-नाशिक रोड जवळ, उत्सव हॉटेल समोरच्या बाजूला, विवियाना मॉल जवळ मेट्रोचे काम सुरू आहे. या ठिकाणी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये पिलरच्या सपोर्टसाठी लावण्यात आलेली लोखंडी प्लेट अंगावर पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.
सुनिता बाबासाहेब कांबळे (वय ३७ वर्षे, राहणार- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चाळ, लोकमान्य नगर पाडा क्रमांक:- ३, परेरा नगर, लोकमान्य नगर), असे मयत महिलेचे नाव आहे. मयत महिला भंगार गोळा करण्याचे काम करते. ती सकाळी भंगार गोळा करण्यासाठी या ठिकाणी गेली होती. अचानक तिच्या अंगावर लोखंडी प्लेट पडली. यावेळी तीचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, राबोडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी व वर्तक नगर पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.
मयत सुनीता यांना स्नेहा आणि प्रणाली अशा दोन लहान मुली आहेत. सुनीता कांबळे यांच्या पतीचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. दोन मुलींचे संगोपन आणि पोट भरण्यासाठी सुनीता या कचरा व भंगार वेचण्याचे काम करत होत्या. दरम्यान, सुनीता यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर आता त्यांच्या दोन मुलींच्या भविष्याचा प्रश्न उभा राहिला आहे. या मुलींना मदतीसाठी सरकारने विचार करावा, त्यांच्यासाठी मदतीचा हात सरकारने पुढे करावा, अशी विनंती सुनीता यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने सुनीता यांच्या अंगावर पडलेली प्लेट बाजूला काढून त्यांचा मृतदेह पुढील कारवाईसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घटेकर यांनी दिली.