ठाणे : कर्जाच्या आमिषाने नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी जेरबंद | पुढारी

ठाणे : कर्जाच्या आमिषाने नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी जेरबंद

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : बँक कर्ज घेण्यासाठी आधी प्रोसेसिंग ‘फी’ भरावी लागेल, असे सांगून नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने लाखोंचा गंडा घालणाऱ्या दिल्लीतील ठगांच्या टोळीच्या डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दरम्यान अद्यापही मुख्य आरोपी फरार आहे. नमन संजय गुप्ता (वय 22, रा. दिल्ली) आकाशकुमार सुनिल चांदवानी (वय 28, रा. दिल्ली), रिशी दीपककुमार सिंग (वय 28, रा. दिल्ली) असे अटक केलेल्या ठगांची नावे आहेत. त्यांच्याकडून 7 लाख 34 हजार 500 आणि 5 मोबाईल फोन, एटीएम कार्ड असा एकूण 9 लाख 21 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

तक्रारदार अनिल कारभारी आव्हाड हे डोंबिवली मानपाडा भागात राहणारे आहेत. नोव्हेंबर महिन्यात त्यांचा एका इमारतीमध्ये नवीन घर घेण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी घर खरेदीसाठी लोन मिळावे, म्हणून विविध बँकांमध्ये प्रयत्न सुरु केले होते. त्यातच त्यांना 22 नोव्हेंबर रोजी मोबाईलवर आर. के. शर्मा नावाच्या व्यक्तीने संपर्क करून मी बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावावर 10 लाखाचे कर्ज पास झाले असल्याचे सांगत थाप मारली.

तसेच कर्ज पाहिजे असल्यास शषांक प्रसाद यांचे नांवे कोटक महिंद्रा, दिल्ली या बँकेचे अकाऊंटवर प्रथम 30 हजार रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल, असे सांगण्यात आले, त्यानंतर वारंवार फोन करून तुम्ही जर पैसे भरले नाही, तर तुमचे यापूर्वी भरलेले पैसे बुडतील, अशी भीती दाखवून त्यांच्याकडून एकूण 7 लाख 34 हजार 500 रुपये विविध बँक अकाऊंटवर भरणा करण्यास भाग पाडले. त्यानंतर कर्ज न देता आणखी एक लाख रुपये द्या, असे सांगितले. दरम्यान, आव्हाड यांना आपली फसवणूक होत असल्याचा संशय आला. त्यांनी 5 डिसेंबर रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन दिल्लीच्या अज्ञात ठगांविरोधात गुन्हा दाखल केला.

तक्रारदार आव्हाड यांनी दिलेल्या माहितीचे आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करुन आव्हाड यांनी ज्या बँकांमध्ये पैसे भरणा केले आहेत. त्या बँकांची माहिती प्राप्त करुन सदरचे बँक अकाऊंट सील करण्याबाबत संबंधित बँकांशी पत्रव्यवहार केला. त्यावरुन सदरचे बँक अकाऊंट सील करण्यात आले. सदर बँक अकाऊंटचे पत्यांवर आरोपीचा दिल्लीत पोलीस पथकाने शोध घेतला असता, आरोपी नमन संजय गुप्ता हा अमृतसर येथे असल्याचे समजल्याने त्याचा अमृतसर येथे शोध घेतला. मात्र, त्यावेळी तो शिमला येथे गेल्याचे पोलीस तपासात आढळून आले. पोलीस पथकाने शिमला येथील एका लॉजमध्ये सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचे साथीदार आकाशकुमार सुनिल चांदवानी यास दिल्ली येथून आणि रिशी दीपककुमार सिंग यास नोयडा येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button