काळी जादू : ठाणे जिल्ह्यावर आजही छाया; कथित डॉक्टर महिलेसह ३ अटकेत | पुढारी

काळी जादू : ठाणे जिल्ह्यावर आजही छाया; कथित डॉक्टर महिलेसह ३ अटकेत

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : काळी जादू : वन्यजीव तस्करीची काळी जादू छाया आजही अनेक अंधश्रद्धाळूंवर कायम आहे. काळी जादू, शौक आणि औषधी वापरासाठी होणाऱ्या या वन्यप्राणी आणि त्यांच्या अवशेषांची तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान केवळ वन विभागच नाही तर निसर्गावर प्रेम करणाऱ्या पर्यावरणप्रेमींसमोरही आहे.

वन विभागाने गुरुवारी रात्री कल्याणमध्ये एका फ्लॅटमध्ये चालणाऱ्या क्लिनिकवर अचानक धाड टाकून तिघांना अटक केली. वन्यजीवांच्या अवयवांची ऑनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्या तिघांमध्ये करणाऱ्या एका महिलेचाही समावेश असून या त्रिकुटाकडून आतापर्यंत 250 इंद्रजाल आणि 50 हातजोड्या हस्तगत केल्या आहेत.

क्लिनिकवर अचानक धाड

वनविभाग आणि वन्यजीव अपराध ब्युरोच्या नवी मुंबईतील बेलापूर शाखेने कल्याण पश्चिमेकडील मॅक्सि ग्राऊंडजवळ असलेल्या नवएव्हरेट टॉवरच्या सी विंगमधल्या 102/103 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये असलेल्या शुभ संकेत वास्तू नावाने कार्यालय थाटलेल्या क्लिनिकवर अचानक धाड टाकली. या क्लिनिकमधून गीता आनंद जाखोटिया (47) या कथित डॉक्टरसह तिचे सप्लायर नवनाथ त्रंबक घुगे (30) आणि अक्षय मनोहर देशमुख (22, रा. म्हारळ) या तिघांना अटक केली.

या कारवाईचे समन्वयक वन्यजीव अपराध ब्युरो अर्थात डब्ल्यूसीसीबी रेजीनलचे उपसंचालक योगेश वरकड, ठाण्याचे उपवन संरक्षक गजेंद्र हिरे यांच्यासह कल्याण विभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर आर. एन. चन्ने यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकणाऱ्या संघाचे नेतृत्व मानद वन्यजीव वॉर्डन आणि डब्ल्यूसीसीबी स्वयंसेवक सुनीश सुब्रमण्यम कुंजू यांनी केले. या संयुक्त कारवाईसाठी वन आणि डब्ल्यूसीसीबी टीमचे सप्पन मोहन, विजय नंदेश्वर, गोल अधिकारी आर. शेलार, दिलीप भोईर, वन रक्षक रोहित भोई, वाय. पी. रिंगणे, विनायक विशे, कार्यालय सहाय्यक जयेश घुगे यांनी मोलाची कामगिरी बजावली.

या त्रिकुटाकडून 250 इंद्रजाल आणि 50 हाथाजोडी (हातजोड्या) असा गौण वनोपज जप्त करण्यात आले. ही वन्यसंपत्ती वन्यजीव अधिनियम 1972 नुसार परिशिष्ट 1 मध्ये संरक्षित प्रजातीमध्ये असून तिची विक्री व अवैधरित्या जवळ बाळगणे बेकायदेशीर असल्याने सदर तिन्ही तस्करांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2 (16), 9, 39, 51, 52 आणि 48 (अ) अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या वस्तू जवळ बाळगणे आणि त्यांची खरेदी-विक्री करणे बेकायदेशीर

हातजोडी आणि काळ्या रंगाची ही जाळी अर्थात इंद्रजाल हे सौभाग्य, संपत्ती, समृद्धीसाठी वापरले जात असल्याचे समजते. तसेच त्यापासून आयुर्वेदिक औषधेही बनवली जातात. आयुर्वेदिक दुकाने, तसेच वास्तू पूजन आणि इतर पूजांसाठी लागणाऱ्या वस्तू विक्रीच्या दुकानांमध्ये इंद्रजाल आणि हातजोडी विक्रीसाठी ठेवली जाते. या वस्तू जवळ बाळगणे आणि त्यांची खरेदी-विक्री करणे बेकायदेशीर आहे.

वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे वॉर्डन सुनीश सुब्रमण्यम कुंजू यांनी सांगितले. तर अटक केलेल्या 3 जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या तिघांना 19 सप्टेंबरपर्यंत अर्थात 2 दिवसांची वन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर आर. एन. चन्ने यांनी सांगितले.

हे ही वाचलं का?

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button