राज्यात वाहन खरेदीत ८.२९ टक्क्यांनी वाढ; दुचाकीला सर्वाधिक पसंती | पुढारी

राज्यात वाहन खरेदीत ८.२९ टक्क्यांनी वाढ; दुचाकीला सर्वाधिक पसंती

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  एकीकडे वाहतूककोंडी, खड्डेमय रस्ते आणि पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर या सारख्या समस्या भेडसावत असल्या तरी राज्यात वाहनखरेदीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाहन खरेदीमध्ये तब्बल ८.२९ टक्क्यांनी वाढ झाली असून वर्षभरात १९ लाख २३ हजार तीन वाहनांची एकूण खरेदी झाली आहे. यात दुचाकीची सर्वाधिक असून, त्यानंतर चारचाकी वाहन खरेदीला नागरिकांनी पसंती दिली आहे.

२०१८ व २०१९ मध्ये बाजारपेठेवर मंदीचे मळभ होते. त्यांनंतर २०२० मध्ये कोरोनाचा कहर व त्यामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वाहन खरेदीचे प्रमाण घटले होते. या २ ते ३ वर्षांत वाहनखरेदीमध्ये घट झाली होती. वर्ष २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये
१४.८९ टक्के; तर २०२० मध्ये २३.१३ टक्के वाहन खरेदीमध्ये घट झाली होती; मात्र २०२१ मध्ये वाहन खरेदी वाढली आहे. त्यामध्ये दुचाकीसह चारचाकी आणि मालवाहतुकीच्या वाहनांची जादा खरेदी झाल्याचे दिसून येत आहे. यावर्षी ४ लाख ५२ हजार ९८७ चारचाकी; तर ६० हजार ३५० मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची खरेदी झाल्याचे ठळक आकडे दिसून येत आहेत.

नऊ महिन्यांत १५ लाख १९ हजार ३२२ वाहनांची खरेदी

चारचाकी असो वा दुचाकी, आपल्याकडे एकतरी वाहन असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. कोरोना काळानंतर सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते या मानसिकतेतून स्वतःचे वाहन खरेदी करण्याची इच्छा आणखीनच बळावत गेल्याचे दिसून आले. त्यामुळे यावर्षी नऊ महिन्यांतच वाहन खरेदीची संख्या प्रचंड वाढली असून गेल्या वर्षीच्या वाहन खरेदीची टक्केवारी पार करण्याची शक्यता दिसून येत आहे. या नऊ महिन्यांत १५ लाख १९ हजार ३२२ वाहनांची खरेदी झाली. नेहमीप्रमाणे दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे. १० लाख ३० हजार दुचाकी, तीन लाख ६३ हजार ६० चारचाकी, मालवाहतूक करणाऱ्या चारचाकी ५१ हजार ४७३ वाहनांचे ठळक आकडे दिसून येत आहे.

Back to top button