

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेली वसईची श्रद्धा वालकर या मृत तरुणीने दोन वर्षांपासून आपल्याला मारहाण होत असल्याचे आपल्या आईला सांगितले होते. मात्र, दरम्यानच्या काळात आईचे आजारपणात निधन झाले. वडिलांनी श्रद्धा हिला वसईला बोलावून तिथेच राहण्याची विनंती केली होती. ती काही दिवस वसईला येऊ राहिलीही; मात्र आफताब तिची समजूत काढून तिला पुन्हा घेऊन गेला. तिने माझे ऐकले असते तर ती वाचली असती, अशी खंत श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी व्यक्त केली.
आफताब पूनावाला आणि श्रद्धाच्या अफेअरबाबत आम्हाला 18 महिन्यांपूर्वी समजले होते, अशी माहिती तिचे वडील विकास वालकर यांनी दिली. मुलीने 2019 मध्ये तिच्या आईला आपण आफताबसोबत लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे सांगितले. आम्ही दोघांनीही तिला विरोध केला. त्यावर तिने मी आता 25 वर्षांची झाली आहे. मला माझे निर्णय घ्यायचा अधिकार आहे. मला आफताबसोबत राहायचे आहे तुमच्यासोबत नाही, असे म्हणत घर सोडण्याचा निर्णय घेतला. तिने मला एक-दोनदा फोन केला होता. तिने आफताब मारहाण करतो, हे सांगितले. मी तिला आफताबला सोडून ये म्हणून सांगितले असे ते म्हणाले .