

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवलीतील बारा वर्षाच्या मुलाचे दीड कोटीच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी विशेष मोहीम राबवून या मुलाची सुखरूप सुटका केली. तब्बल ७५ तासानंतर गुजरात राज्यातून त्याची सुटका करु पोलिसांनी आरोपींना अटक केली. फरहदशहा रफाई (२६), प्रिंसकुमार सिंग, (वय २४) , शाहीन मेहतर, (वय २७) ,फरहीन सिंग (वय २०) , नाझिया रफाई, (वय २५) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. (Thane)
याबाबतची अधिक माहिती अशी की, बारा वर्षाचा रुद्र झा हा डोंबिवलीतील व्यापारी रणजीत झा यांचा मुलगा. 9 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास रूद्र क्लासवरून घरी येत होता. दरम्यान आरोपींनी त्याचे गाडीमधून अपहरण केले. त्यानंतर त्याच्या वडिलांना मुलाच्या सुटकेसाठी दीड कोटी रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी स्थानिक मानपाडा पोलिसांशी संपर्क साधून मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी घटनांचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, कल्याण पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनाही माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी शहरात लावलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास पुढे चालू ठेवला. (Thane)
पोलिसांनी सीसीटिव्हीच्या आधारे आरोपीच्या गाडीचा तपास घेतला. या तपासात संबंधित गाडी डोंबिवली, बदलापूर, खडवली, जव्हार, पालघर, सुरत मार्गे पुढे गेल्याचे आढळून आले. त्यानंतर गुजरात राज्यात विविध गावांमध्ये शोध घेण्यात आला. या तपासात संबंधित आरोपी गुजरात राज्यातील खुडसत गावात एका घरात लपले असल्याची माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांच्या २० जणांच्या टीमने संपूर्ण गावाला वेढा घातला. त्यानंतर घरावर छापा टाकून अपहरण केलेल्या रुद्रची सुखरूप सुटका केली. यातील मुख्य आरोपी फरहदशहा रफाई, प्रिंसकुमार सिंग, शाहीन मेहतर, फरहिन सिंग, आणि नाझिया रफाई यांना रंगेहाथ पकडून बेड्या ठोकल्या.
हेही वाचा