ठाणे : संभाजी ब्रिगेडकडून विकृत द़ृश्यांची यादी जाहीर | पुढारी

ठाणे : संभाजी ब्रिगेडकडून विकृत द़ृश्यांची यादी जाहीर

ठाणे; अनुपमा गुंडे : राज्यात ‘हर हर महादेव’वरून रणकंदन सुरू झाले असतानाच त्यात संभाजी ब्रिगेडनेही उडी घेतली आहे. इतिहासाचा विपर्यास करणार्‍या या चित्रपटाची मान्यताच रद्द करावी, अशी मागणी सेन्सॉर बोर्डाकडे करण्याचा निर्णय ब्रिगेडने घेतला आहे.

या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा व सरदारांचा चुकीचा इतिहास दाखवून त्यांची बदनामी करण्यात आली आहे. इतिहासाची मोडतोड करून विकृतीकरण करण्यात आले आहे, याची उदाहरणेच संभाजी ब्रिगेडचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष सुभाष सावंत यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली. ती अशी…

  • बांदल-देशमुख, जेधे-देशमुख हे 12 मावळातले देशमुख स्वतःला राजेच मानत; पण शहाजी महाराजांना 12 मावळ्यातील परगाणा मिळाल्यावर कान्होजी नाईकांच्या नेतृत्वाखाली शहाजीराजेंकडे गेले. कान्होजी नाईक हे शहाजी महाराजांचा उजवा हात होते. तसेच बांदल-देशमुखही शिवाजी महाराजांच्या पाठीशी होते. या चित्रपटात बांदल-देशमुख हे मग्रूर दाखवले. बकर्‍यासाठी एकमेकांचे गळे कापतात, असे चित्रपटात दाखवण्यात आले. बाजीप्रभू देशपांडे हेसुद्धा शिवाजी महाराजांशी लढतात. हे दाखवले, हा कुठला इतिहास.
  • शिवरायांच्या राज्यात स्त्रियांना सन्मानाची वागणूक होती. इतिहासातही या काळात स्त्रियांचा बाजार भरलेला आहे, अशी नोंद नाही; मात्र या चित्रपटात स्त्रियांचा बाजार मावळखोर्‍यात दाखविण्यात आला आहे.
  •  अफजलखान शिवाजी महाराज यांच्या डोक्यात खंजीर खुपसतो, असे चित्रपटात दाखवले, नरसिंह रूपात शिवाजी महाराज अफजलखानाचा वध करतात, ही द़ृश्ये हास्यापद दाखविण्यात आली आहेत.
  •  बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे यांचे चारित्र्य विकृत दाखवण्यात आले आहे.
  • बाजीप्रभू देशपांडेंसारखे शिवरायांचे एकनिष्ठ, स्वामीनिष्ठ सरदार चित्रपटात शिरस्राण न घालता, महाराजांसमोरही तसेच वावरताना दाखविण्यात आले आहेत.
  • मराठ्यांच्या कोणत्याही परंपरांचा अभ्यास चित्रपट तयार करताना करण्यात आला नाही.
  •  बाजीप्रभू हे लढवय्ये होते. ताकदीचा माणूस होता, महाराजांना त्यांची स्वामीनिष्ठा माहिती होती, बाजीप्रभू देशपांडेंना मोठे करण्याच्या प्रयत्नात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभूंच्या स्वामीनिष्ठेचा आणि त्यांच्या हौतात्म्याचा, शिवाजी महाराजांच्या महानतेचा अवमान करण्यात आला. कान्होजी नाईक, जेधे-देशमुख, जेधे-बांदल या सरदारांचे अवमूल्यन केले आहे.
  • रामदासी वेशात छत्रपती शिवाजी महाराज दाखविण्यात आले आहेत. हेही द़ृश्य हास्यापद आहे.

चित्रपट दिग्दर्शकाने सेन्सॉर बोर्डाकडे काही पुरावे दिले असल्याचा दावा केला असला, तरी ज्या पुस्तकांचा आधार त्यांनी दिला आहे, त्यासाठी कोणते संदर्भग्रंथ वापरले आहेत, या सर्व कायदेशीर बाबींचा संभाजी ब्रिगेड अभ्यास करूनच सेन्सॉर बोर्डाकडे जाणार आहे.
– सुभाष सावंत,
नवी मुंबई जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

Back to top button