बारामती : जितेंद्र आव्हाडांचा स्टंट त्यांच्या अंगलट : आमदार राम शिंदे यांचा टोला | पुढारी

बारामती : जितेंद्र आव्हाडांचा स्टंट त्यांच्या अंगलट : आमदार राम शिंदे यांचा टोला

बारामती : पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड यांना नेहमीच स्टंट करण्याची, वात्रट, वाचाळ बोलण्याची सवय आहे. हर हर महादेव चित्रपटाला सेन्साॅर बोर्डाने मान्यता दिली असताना त्यांनी चित्रपटगृहात जावून स्टंटबाजी करण्याची गरज नव्हती. त्यांची ही स्टंटबाजी त्यांच्या अंगलट आली असल्याचे मत माजी मंत्री, आमदार प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले.

बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. शिंदे म्हणाले, देशात कायदा आहे. कायद्यानुसार सगळ्या गोष्टी होत असतात. हर हर महादेव चित्रपटाला सेन्साॅर बोर्डाने मान्यता दिली. प्राॅडक्शनने त्यावर अभ्यास केला. सर्वोच्च व्यवस्थेने मान्यता दिली असताना मंत्री असो कि आमदार, कोणालाही कायदा हातात घेण्याचा, कोणाच्याही सार्वभौमत्वावर गदा आणण्याचा अधिकार नाही.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मारहाण करणे कोणत्या कायद्यात बसते असा सवाल करून शिंदे म्हणाले, मारहाण होत असेल तर संबंधितावर कारवाई होवून अटक झालीच पाहिजे. राज्य कायद्याचे आहे, राज्य घटनेचे आहे. आव्हाडांना स्टंट करण्याची, वात्रट व वाचाळ बोलण्याची सवय, त्यातून ते सुधरतील अशी अपेक्षा मला आहे, असेही शिंदे म्हणाले.

Back to top button